मंकीपॉक्सवरून चीन, बांगलादेशही सतर्क; संसर्ग टाळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे जागतिक समुदायाला आवाहन

बीजिंग – जागतिक पातळीवर मंकीपॉक्सच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये सतत वाढ होत असल्याने चीनच्या अधिकाऱ्यांनी एमपॉक्स विषाणूचा देशात प्रादुर्भाव टाळण्यासाठीचे प्रयत्न तीव्र केले आहेत.
या महिन्याच्या १५ तारखेपासून सहा महिन्यांसाठी एमपीक्स संक्रमण असलेल्या देशांमधून चीनमध्ये येणाऱ्यांनी त्यांची आरोग्यविषयक स्थिती घोषित करणे अनिवार्य असणार आहे.
जर त्यांना एमपॉक्सची लागण झाली असेल किंवा त्यांना ताप, डोकेदुखी, पाठदुखी, स्नायू दुखणे, यांसारखी लक्षणे दिसून आली असतील. सुजलेल्या लिम्फ नोड्स किंवा पुरळ आले असतील, तर त्याची पूर्वकल्पना दिली जाणे आवश्यक असणार आहे.
अशा व्यक्तींसाठी, सीमाशुल्क अधिकारी वैद्यकीय उपाय लागू करतील आणि त्यांच्या नमुन्यांची चाचणी करतील. संक्रमण असलेल्या देशांमधून येणाऱी मालवाहू वाहने आणि कंटेनरचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.
जगभर एमपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने बांगलादेशानेही प्रभावी उपाययोजना सुरू केल्या आहेत. ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाने काल अशा प्रवाशांचे तापमान तपासण्यास सुरुवात केली.
याव्यतिरिक्त, विमान कंपन्यांना सतर्क राहण्यास आणि कोणत्याही प्रवाशाला लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य विभागाला सांगण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये अलिकडेच एमपॉक्सची लागण झालेले ३ रुग्ण सापडल्यामुळे ही खबरदारी घेण्यात येत आहे.
एमपॉक्सचा सर्वाधिक प्रादुर्भाव सध्या आप्रिकेतील कॉंगोमध्ये आहे. त्यामुळे आप्रिकेतील देशांमध्ये अधिक सतर्कता बाळगण्यास सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोंसा यांनी या विषाणूच्या वाढत्या संक्रमणाविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच हे संक्रमण त्वरित रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन केले आहे.
साथीच्या रोगाचा प्रतिबंध, तयारी आणि प्रतिसादासाठी रामाफोसा यांनी आज एक निवेदन जारी केले. २०२४ मध्ये आप्रिकन युनियनच्या १३ सदस्य देशांमध्ये एमपॉक्सची एकूण १७ हजार ५४१ प्रकरणे सापडली आहेत आणि ५१७ मृत्यूची नोंद झाली आहे, असे रामफोंसा यांनी म्हटले आहे.
आफ्रिकेतील संक्रमणाला रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी आणि सर्व देशांनी सहकार्य करावे. या विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला तात्काळ मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.





