Chilli Price Hike : तिखट झाली मिरची! अवकाळीचा फटका अन् गृहिणींचे बजेट कोलमडले; पाहा काय आहे दर
Chilli Price Hike : लवंगी आणि बेडगी मिरचीच्या दरात मोठी तेजी; मिरची कुटून देणाऱ्या डंकाबाहेर गृहिणींच्या सकाळपासूनच रांगा

Chilli Price Hike – उन्हाळा सुरु झाला असून घरातील प्रत्येक गृहिणीला चटणी बनवण्याचे वेध लागले आहेत. मात्र, अवकाळी पावसाने मिरची पिकाला फटका बसल्याने दरवाढीच्या झळा गृहिणींना सोसाव्या लागत आहेत. लवंगी, बेडगी, संकेश्वरी, साधी मिरचीच्या दरात 100 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीतही गृहिणींना मिरची खरेदी करावी लागत आहे.
शहरातील बाजारपेठेत चटणी करण्यासाठी लाल मिरची दाखल झाली आहे. विक्रेत्यांनी दुकानाबाहेर लवंगी, बेडगी, संकेश्वरी, साधी मिरची यांची पोती उभी केली आहेत. या मिरचीच्या खरेदीसाठी गृहिणी दुकानात गर्दी करत आहेत. परंतु, दरवाढ ऐकून त्यांचे बजेट कोलमडले आहे. काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसानेही हजेरी लावल्याने मिरची पिकाला फटका बसल्याने दरात तेजी आली आहे.
लवंगी 280 रुपये किलो, बेडगी 300 ते 350 रुपये किलो, संकेश्वरी 340 ते 390 किलो, साधी मिर्ची 260 रुपये किलो दराने विकली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दरात 100 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे. तरी देखील चटणीसाठी मिर्ची खरेदी करावी लागत आहे. दिवसभर दुकानात तीन किलो, पाच किलो, आठ किलो अशी मिरची विकली जात आहे.
उन्हाचा चटका बसत असूनही खरेदी सुरु आहे. कारण बारा दिवसांनी मे महिना सुरु होणार आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात पावसाने सुरुवात केल्याने अनेक महिलांना चटणी करता आली नाही. यामुळे यंदा एप्रिल महिन्यातच तयारी सूरु आहे. शहरातील मिरचीच्या डंकांवरही गर्दी होत आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून मिरची कुटून घ्यायला गृहिणी डंकाबाहेर उभ्या राहत आहेत. एका डंकावर दिवसभर किमान सात ते आठ महिला मिरची कुटून घेत आहेत. मिरची कुटून देण्यासाठी किलोला 50 ते 60 रुपये घेत होते. यावर्षी किलोला 70 ते 80 रुपये घेतले जात आहेत.
खडा मसालाही महागला
चटणी करताना धने, जिरे, तीळ, खोबरे, मोहरी, हळकुंड, मेथी, बडीशेप, लवंग, दालचिनी, बदामफुल, खसखस, मिरे, शहाजिरे, तमालपत्री, दगडफूल, मसाला वेलची, जायफळ, हिंग, त्रिफळा असा खडा मसाला वापरला जातो. या खडा मसाल्याचेही दर वाढले असल्याने चटणीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे.






