दुबईमध्ये पार पडलेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील विजेता निश्चित झाला असला आणि भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मात करून या करंडकावर नाव कोरले असले, तरी अद्यापही या स्पर्धेवरून निर्माण झालेला वादविवाद सुरूच आहे. आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी मोहसीन नक्वी यांनी विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला प्रदान केली नाही ती ट्रॉफी घेण्यासाठी सूर्यकुमारने दुबईमध्ये यावे, अशी सूचना केली आहे. गेल्या रविवारी जेव्हा अंतिम सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानवर मात करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले तेव्हा विजेता संघ मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी किंवा मेडल्स घेणार नाही हे आधीच ठरले होते. त्याची कल्पना असूनही समारंभामध्ये नक्वी यांनी गोंधळाचे वातावरण निर्माण केले. मी एखाद्या कार्टूनप्रमाणे भारतीय खेळाडूंची वाट बघत उभा होतो अशा प्रकारचे विधान नंतर नक्वी यांनी केले आणि आपण खरोखरच कार्टून आहोत हे ते सातत्याने सिद्ध करत आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री असलेल्या आणि भारताविरोधात सतत गरळ ओकणार्या आणि भारतावर अणुहल्ल्याची धमकी देणार्या मोहसीन नक्वी यांच्याकडून आम्ही विजयी ट्रॉफी स्वीकारणार नाही याची कल्पना भारतीय संघ व्यवस्थापनाने आधीच पाकिस्तानला आणि आयसीसीला दिली होती. अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरण समारंभात नक्वी यांच्याऐवजी कोणाकडूनही ट्रॉफी आणि मेडल स्वीकारण्याची तयारी भारतीय संघ व्यवस्थापनाने केली होती. पण त्यावेळी मोठे मन दाखवायची संधी उपलब्ध झाली असतानासुद्धा मोहसीन नक्वी यांनी गल्ली क्रिकेटमधील मानसिकता दाखवून ट्रॉफी अन्य कोणाच्या हस्ते भारतीय संघाला न देता सरळ ती ट्रॉफी घेऊन ते आपल्या हॉटेलच्या रूममध्ये परतले होते. या विषयावरून वादंग निर्माण होणार आणि आयसीसीकडून किंवा बीसीसीआयकडून जाब विचारला जाणार याची खात्री असल्यानेच नक्वी यांनी या संपूर्ण विषयाबाबत पडदा टाकण्याचा जरी प्रयत्न केला असला, तरी त्यांनी ही ट्रॉफी मिळवण्यासाठी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने दुबईमध्ये यावे, अशी सूचना करून हा वाद न मिटवता उलट वाढवायचाच प्रयत्न केला आहे. कारण आता आशियाई क्रिकेट समितीचे सर्व पदाधिकारी आणि नक्वी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सर्व पदाधिकारीसुद्धा पाकिस्तानात परतले आहेत. सूर्यकुमार यादवने भर मैदानात नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिला. सूर्यकुमार किंवा इतर संघ सहकारी फक्त ट्रॉफी नेण्यासाठी पुन्हा एकदा दुबईला जातील असे मानणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. बीसीसीआयने याच शब्दांमध्ये नक्वी यांना सुनावले आहे. अर्थात, आपली विचित्र विधाने आणि आपली विचित्र कृती यासाठी नेहमीच प्रसिद्ध असलेले हे पाकिस्तानचे गृहमंत्री महाशय नेहमीच कार्टून असल्याच्या अविर्भावातच वावरत असतात. भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये लष्करी संघर्ष सुरू असतानाही विविध प्रकारची विचित्र विधाने करून मीडियाचे लक्ष आपल्यावर कसे राहील याकडेच त्यांचे प्राधान्य असे. क्रिकेटमध्ये किंवा इतर कोणत्याही खेळामध्ये अशा प्रकारे राजकारण आणू नये असे बजावणार्या नक्वी यांनीच या सर्व विषयाला सुरुवात केली होती हेसुद्धा नाकारून चालणार नाही. आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ही स्पर्धा व्यवस्थित पार पाडणे आवश्यक होते. बक्षीस समारंभाच्या वेळी मोठ्या मनाने त्यांनी तेथील दुबईचे पदाधिकारी किंवा बांगलादेशचे पदाधिकारी यांच्या हस्ते जर ट्रॉफी दिली असती, तर हा विषय निर्माण झाला नसता आणि वाढला नसता. अतिशय अहंकारी वृत्तीचे आणि बालिश पद्धतीने वर्तन करणारे नक्वी यांच्याकडून तशी अपेक्षाच नव्हती. सूर्यकुमारने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यावर ती ट्रॉफी आपल्या हॉटेल रूममध्ये नेऊन नक्वी यांनी आपल्या बालिशपणाचा आणि कार्टूनपणाचा कळस दाखवून दिला. आयसीसी किंवा बीसीसीआय या विषयावर कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतरही नक्वी यांनी विजयी ट्रॉफी सूर्यकुमार यादवला सहजासहजी देण्यास मात्र नकार दिला आहे आणि भारतीय संघ व्यवस्थापनालासुद्धा आता ती ट्रॉफी परत घेण्यात कोणताही रस नाही. त्या दिवशी मैदानावर हातात ट्रॉफी नसतानाही सूर्यकुमार आणि त्याच्या सहकार्यांनी वेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन केले होते. आशिया करंडक स्पर्धेचा चॅम्पियन भारत आहे याची नोंदही कागदावर झाली आहे. त्यामुळे ट्रॉफी हातात येवो किंवा न येवो भारत हाच चॅम्पियन आहे याबाबत कोणीही शंका घेऊ शकत नाही. मोहसीन नक्वी किंवा पाकिस्तानमधील इतर पदाधिकार्यांनी कितीही बालिश विधाने केली तरी त्याला बीसीसीआय किंवा भारतीय संघ व्यवस्थापन फारसे महत्त्व देईल असे नाही. एक मात्र निश्चित की लवकरच जेव्हा आयसीसीची मिटिंग होणार आहे. त्या मिटिंगमध्ये बीसीसीआय हा विषय उचलून धरणार आहे आणि मोहसीन नक्वी यांच्यावर आणखीन मोठी कारवाई करण्याचा आग्रहही केला जाईल अशी शक्यता आहे. विजेत्या संघाला ट्रॉफी नाकारणे हे अत्यंत चुकीचे आहे, अशाच प्रकारची भूमिका बहुतेक क्रिकेट संघटनानी घेतल्यामुळे आपण या विषयावर उघडे पडले आहोत हे नकवी यांच्या लक्षात आले आहे. विजेत्या संघाला ट्रॉफी नाकारणार्या अधिकार्यावर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. तरच सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणार्या क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा सभ्यपणा प्रस्थापित केला जाईल.