Mobile screen: मोबाईलच्या पडद्याआड हरवतंय बालपण; मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे वाढतोय मानसिक ताण!
ऑनलाइन गेम्सचे व्यसन, अभ्यासाचा दबाव आणि एकटेपणाचा विळखा

अस्मिता हिरवे
पिंपरी – एकेकाळी संध्याकाळ झाली की गल्लीबोळांत मुलांचा किलबिलाट ऐकू यायचा. मैदानावर पकडापकडी, लपंडाव, लगोरी आणि क्रिकेट खेळताना रंगणारा गोंधळ हेच बालपणाचे खरे चित्र होते. मात्र, आता या चित्राची जागा मोबाइलच्या पडद्याने घेतली आहे.
हातात खेळणी असण्याच्या वयात मुलांच्या हातात स्मार्टफोन दिसत आहेत. जेवताना मोबाइल, झोपताना मोबाइल आणि मोकळा वेळ मिळाला की ऑनलाइन गेम्स, रील्स आणि व्हिडिओ… अशा डिजिटल विश्वात मुलांचे बालपण अडकत चालले आहे.
मोबाइलचा अतिवापर, ऑनलाइन गेम्सचे वाढते आकर्षण आणि अभ्यासातील स्पर्धेमुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे. विशेषतः लहान वयातच एकाग्रतेचा अभाव, चिडचिडेपणा, अस्वस्थता, झोपेच्या तक्रारी आणि सामाजिक संवादातील कमीपणा जाणवण्याची शक्यता वाढते.
मोबाईल काढून घेतल्यावर रडणे, रागावणे किंवा आक्रमक होणे, गेम खेळण्यासाठी जेवण आणि झोप टाळणे ही पालकांनी गांभीर्याने घेण्याची लक्षणे आहेत. मुलांच्या या बदलांकडे केवळ हट्टीपणा म्हणून पाहण्याऐवजी त्यामागील मानसिक कारणे समजून घेण्याची गरज आहे.
एकाग्रता, झोप आणि संवादावर परिणाम!
सतत बदलणारे व्हिडिओ, गेम्समधील आकर्षक दृश्ये आणि मिळणारी तात्काळ बक्षिसे यामुळे मुलांना सतत नव्या उत्तेजनाची सवय लागू शकते. परिणामी, अभ्यास, वाचन किंवा एखाद्या कामावर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. रात्री उशिरापर्यंत स्क्रीन पाहिल्याने झोपेचे वेळापत्रक बिघडते आणि दुसऱ्या दिवशी शाळेत थकवा, झोपाळूपणा व अभ्यासातील अनास्था जाणवू शकते.
मैदानी खेळ आणि प्रत्यक्ष मित्रांशी संवाद कमी झाल्याने सामाजिक कौशल्यांच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो. यासोबतच परीक्षेतील गुण, पालकांच्या अपेक्षा आणि स्पर्धेचा दबाव मुलांच्या मनावर अतिरिक्त ओझे निर्माण करतो. या ताणातून काही मुले मोबाइलमध्ये रमण्याचा मार्ग निवडतात.
मात्र, त्यामुळे मूळ समस्या सुटण्याऐवजी अभ्यासाचे नुकसान आणि मानसिक अस्वस्थता वाढू शकते. लहान मुलांच्या विकासात पालकांशी संवाद, गोष्टी ऐकणे, खेळणे आणि प्रत्यक्ष अनुभव यांना पर्याय नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
पालकांची भूमिका महत्त्वाची!
इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या (IAP) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दोन वर्षांखालील मुलांना स्क्रीन देऊ नये. दोन ते पाच वर्षांच्या मुलांसाठी दिवसातून जास्तीत जास्त एक तास आणि पाच ते दहा वर्षांच्या मुलांसाठी दोन तासांपेक्षा कमी स्क्रीन वापराची मर्यादा सुचविण्यात आली आहे. स्क्रीनचा वापर झोप, अभ्यास, शारीरिक हालचाल आणि कुटुंबीयांशी संवाद यांची जागा घेणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी केवळ त्यांच्यावर निर्बंध लादून चालणार नाही, तर पालकांनीही स्वतःच्या स्क्रीन वापरावर नियंत्रण ठेवले पाहिजे. जेवताना मोबाइल बंद ठेवणे, झोपण्यापूर्वी किमान एक तास स्क्रीनपासून दूर राहणे, दररोज मैदानी खेळासाठी वेळ देणे आणि आठवड्यातून काही तास संपूर्ण कुटुंबाने डिजिटल साधनांपासून दूर राहणे अशा सवयी उपयोगी ठरू शकतात.
मुलांच्या वागण्यात सतत चिडचिड, एकटेपणा, भीती किंवा अभ्यासातील मोठा बदल जाणवत असल्यास बालमानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्यावी. बालदिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस न राहता प्रत्येक मुलाला सुरक्षित, आनंदी आणि तणावमुक्त बालपण देण्याचा संकल्प करण्याचा दिवस ठरावा. कारण मुलांना महागडी गॅझेट्स नव्हे, तर पालकांचा वेळ, प्रेम, संवाद आणि समजून घेणारे वातावरण अधिक आवश्यक आहे.
मुलांच्या डिजिटल आरोग्यासाठी पालकांनी काय करावे?
– वयानुसार स्क्रीन मर्यादा : दोन वर्षांखालील मुलांना स्क्रीन देऊ नये. मोठ्या मुलांसाठी वयानुसार मर्यादा ठरवावी.
– जेवणात मोबाइल बंद : जेवताना आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना स्क्रीनचा वापर टाळावा.
– झोपेला प्राधान्य : झोपण्यापूर्वी एक तास सर्व डिजिटल साधने बंद ठेवावीत.
– मैदानाशी मैत्री : मुलांना सायकलिंग, मैदानी खेळ, वाचन, चित्रकला आणि संगीताची आवड निर्माण करून द्यावी.
– संवादाचे वातावरण : मुलांना रागावण्याऐवजी त्यांच्या अडचणी ऐकून घ्याव्यात. त्यांच्या भावनांना महत्त्व द्यावे.
मदतीसाठी महत्त्वाचे क्रमांक :
– टेली-मानस : 14416 (२४ तास मानसिक आरोग्य सहाय्य)
– मनोदर्पण : 8448440632 (विद्यार्थ्यांसाठी भावनिक सहाय्य)
– चाइल्ड हेल्पलाइन : 1098 (मुलांच्या संरक्षण व मदतीसाठी)





