Teachers’ Day : “बालपण जपण्याचे काम…”; शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला शिक्षकांसोबत संवाद
Teachers' Day : मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या उभारणीबाबत शिक्षकांशी सविस्तर चर्चा

Teachers’ Day : शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या उभारणीबाबत शिक्षकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी मोदींनी शिक्षकांसोबत विविध विषयांवर चर्चा करत त्यांच्याकडून अनेक गोष्टींवर सल्ला मागितला.
पंतप्रधानांनी यावेळी आपली पब्लिक स्पीकिंग स्किल्स अधिक चांगली करण्यासाठी सल्ला मागितले. ‘जर मी तुमच्या इथे विद्यार्थी असतो आणि मला कुशल वक्ता बनायचं असेल तर तुम्ही मला काय सल्ला द्याल? मी काय केलं पाहिजे?’ असा सवाल पंतप्रधानांनी केला.
त्यावर एका शिक्षिकेने उत्तर दिलं. सर्वात आधी तुमच्यात आत्मविश्वास असायला पाहिजे. सराव आणि अभ्यासाने आत्मविश्वास येतो. तुमचं व्यक्तिमत्त्व पाहून मी स्वत: घाबरले होते, असं या शिक्षिकेने सांगितलं.
पुढे संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “एखादे मूल अभ्यासात थोडे मागे असू शकते, परंतु देवाने प्रत्येकाला काही ना काही चांगले गुण दिले असतात. तुम्ही शिक्षकांनी त्या मुलांमधील टॅलेंट ओळखण्याचा प्रयत्न करता का?”
यावर शिक्षकांनी उत्तर दिले की, “आम्ही नक्कीच असा प्रयत्न करतो, कारण आमच्या मते प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गुण, कौशल्ये आणि आव्हाने असतात. एक शिक्षक म्हणून त्या सर्वांचे टॅलेंट ओळखणे हेच आमचे मुख्य काम असते.”
“स्क्रीन टाईम हे एक प्रकारचे व्यसन बनले आहे”
डिजिटल युगातील आव्हानांवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “स्क्रीन टाईम हा एक गंभीर विषय असून ते आता एका प्रकारचे व्यसन बनले आहे. मुलांनी मैदानी खेळ खेळण्यास सुरुवात केली तर हळूहळू ते या व्यसनातून बाहेर पडू शकतात. म्हणूनच आपण मुलांना नवनवीन सर्जनशील उपक्रमांशी जोडण्याची सवय लावली पाहिजे. मैदानी खेळांमध्ये मुलांनी रस घ्यावा म्हणून आपल्याला असे काही प्रोग्राम तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यातून मुलांना प्रेरणा मिळेल,” असेही मोदी म्हणाले.
“बालपण संपता कामा नये”
मी आता तुमच्याशी संवाद साधतोय. पण मला सर्व शिक्षकांना सांगायचं की, आपल्याला आता पुस्तकं आणि अभ्यासक्रमातून बाहेर पडून मुलांच्या आयुष्यात घुसलं पाहिजे. बालपण मरता कामा नये. बालपण कायम राखण्याचं सर्वात मोठं काम शिक्षकांचं आहे. मुलांमधील बालपण कधीही संपू देता कामा नये. ते जपण्याचे सर्वात मोठे काम शिक्षकच करू शकतात,” असा सल्लाही त्यांनी दिला.
हेही वाचा:
Bhuinj News : ‘लेडी सिंघम’चा धडाका; पोलिस उपअधीक्षक पूनम झगडे यांच्या कारवाईने अवैध धंद्याना लगाम





