Child Rights And Education: बालपण हरवतेय भंगाराच्या पोत्यात! कामशेतमध्ये बालपण हरवल्याचे मन हेलावणारे चित्र
Child Rights And Education: कामशेत शहरातील रहिवासी भागात अल्पवयीन मुलांकडून भंगार गोळा करण्याचे प्रमाण वाढले; बालहक्क आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

– चेतन वाघमारे
Child Rights And Education – शहरातील रहिवासी भागात भंगार गोळा करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. परिसरातील विविध रस्ते, सोसायट्या, बाजारपेठ आणि रहिवासी भागात लहान मुले पोती, हातगाडी किंवा अन्य साधनांच्या मदतीने भंगार गोळा करताना दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दिवसभर परिसरात फिरून प्लास्टिक, लोखंड, बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा करून ती भंगार दुकानांमध्ये विकली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
शाळेत जाण्याचे आणि खेळण्याचे वय असलेल्या मुलांच्या हातात भंगाराचे पोते दिसत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे. हा प्रकार केवळ बालकामगाराचा प्रश्न नसून मुलांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या शिक्षणाचा आणि भविष्यातील विकासाचा प्रश्न असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कामशेत शहरातील विविध रहिवासी भागांत सकाळपासून काही अल्पवयीन मुले भंगार गोळा करताना दिसत असल्याचे नागरिक सांगतात.
घराघरांतून बाहेर पडणारे कागद, प्लास्टिक, लोखंडी वस्तू, जुन्या बाटल्या, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे भाग तसेच इतर टाकाऊ साहित्य जमा करण्यासाठी ही मुले परिसरात फिरतात. काही मुले पोत्यामध्ये भंगार भरून ते डोक्यावर किंवा खांद्यावर वाहून नेत असल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास येते. काही मुले हातगाडीच्या माध्यमातून भंगार जमा करतात. गोळा केलेले साहित्य नंतर भंगार व्यावसायिकांकडे विकले जात असल्याचे सांगण्यात येते.
विशेष म्हणजे, रहिवासी परिसरात नागरिकांच्या नियमित वर्दळीबरोबरच वाहनांचीही मोठी ये-जा असते. त्यामुळे रस्त्यावर भंगार गोळा करणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भंगाराच्या स्वरूपात जमा होणाऱ्या अनेक वस्तू धोकादायक असतात. काचेच्या बाटल्या, धारदार लोखंडी वस्तू, पत्रे, तारा, जुन्या मशीनरीचे भाग आणि इतर साहित्य हाताळताना मुलांना दुखापत होण्याची शक्यता असते.
कधी कधी भंगारामध्ये नेमके काय आहे, याची माहिती नसते. त्यामुळे एखादी धारदार वस्तू, रसायनाचा अंश असलेले साहित्य किंवा खराब झालेली विद्युत उपकरणे हाताळल्यास अपघात होऊ शकतो. याशिवाय रस्त्यावरून फिरताना वाहनांची धडक बसण्याचा धोका आहे. मोठ्या वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर मुलांनी भंगार गोळा करणे अधिक धोकादायक ठरू शकते.
त्यामुळे या मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. शहरात हा प्रकार प्रत्यक्षात किती प्रमाणात आहे, याची माहिती घेण्यासाठी संबंधित विभागांनी संयुक्त तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शाळाबाह्य मुलांची संख्या तपासावी. भंगार गोळा करणाऱ्या मुलांची ओळख पटवावी.
त्यांचे वय, पालकांची माहिती आणि शैक्षणिक स्थिती तपासावी. मुलांकडून काम करून घेतले जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच अशा मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.






