ZP School Mawal: ‘शैक्षणिक क्रांती’ कागदावरच! मावळातील जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था…पाहा धक्कादायक वास्तव
ZP School Mawal: गळक्या वर्गखोल्या आणि अस्वच्छ परिसरामुळे आरोग्य धोक्यात; शाळांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी देण्याची मागणी.

– चेतन वाघमारे
ZP School Mawal – मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र अनेक शाळांमधील प्रत्यक्ष परिस्थिती पाहता या निधीचा उपयोग नेमका कुठे होतो, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. वर्गखोल्यांची दुरवस्था, गळके छत, तुटलेल्या फरशा, अस्वच्छ स्वच्छतागृहे,
पिण्याच्या पाण्याची समस्या आणि डिजिटल सुविधांचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात शैक्षणिक क्रांती झाली, असे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी ग्रामीण भागातील काही शाळांची अवस्था पाहता ही क्रांती नेमकी कुठे झाली, असा संतप्त सवाल पालकांकडून विचारला जात आहे.
तालुक्यातील डोंगराळ आणि ग्रामीण भागात अनेक जिल्हा परिषद शाळा आहेत. या शाळांमध्ये शेतकरी, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेतात. मात्र काही शाळांच्या इमारतींची नियमित देखभाल होत नसल्याने त्यांची अवस्था खराब होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी वर्गखोल्यांची परिस्थिती देखील चिंताजनक असल्याचे चित्र आहे.
अनेकदा पावसाळ्यात छतांमधून पाणी गळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसवायचे कसे, असा प्रश्न शिक्षकांसमोरही निर्माण होतो. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृह असणे अत्यावश्यक असते. मात्र काही शाळांमध्ये स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पाण्याची उपलब्धता नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते.
तसेच शाळेच्या आवारातील कचरा, साचलेले पाणी आणि अस्वच्छ परिसर यामुळेही विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे ही मूलभूत गरज आहे. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाक्या आहेत, मात्र स्वच्छता आणि देखभालीवर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. शाळेची भौतिक अवस्था जितकी महत्त्वाची आहे, तितकेच अध्यापनही महत्त्वाचे आहे.
शिक्षकांच्या उपस्थितीसोबतच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची तपासणी देखील आवश्यक आहे. शिक्षकांवर दोषारोप करण्यापेक्षा शाळेतील संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याची गरज आहे. शिक्षकांना आवश्यक सुविधा, शैक्षणिक साहित्य आणि तांत्रिक साधने उपलब्ध करून देतानाच त्यांच्या कामाचेही नियमित मूल्यमापन होणे गरजेचे आहे.
डिजिटल शिक्षणाचा नुसता गाजावाजा
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना संगणक, इंटरनेट, प्रोजेक्टर आणि डिजिटल शैक्षणिक साधनांचा वापर करून शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र काही शाळांमध्ये संगणक उपलब्ध असले तरी ते कार्यरत आहेत का, इंटरनेटची सुविधा आणि डिजिटल साधनांचा प्रत्यक्ष अध्यापनाबाबत तपासणी होणे आवश्यक आहे.






