Child Murder Case: चाकणमधील ‘त्या’ चिमुरड्याच्या निर्घृण खूनप्रकरणी नराधमाला जन्मठेप! न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
Child Murder Case: जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांचा निकाल; घरातील बेडरूममधील पाण्याच्या टाकीत लपवला होता बालकाचा मृतदेह.

Child Murder Case – खेड तालुक्यातील चाकण येथे 2016 मध्ये शेजारी राहणार्या चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी सचिन दत्तात्रय पिंगळे (वय 46, रा. आंबेडकरनगर, चाकण) याला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व 25 हजार रुपये दंड ठोठावला. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी हा निकाल दिला.
खटल्यातील माहितीनुसार, 5 एप्रिल 2016 रोजी संजोग उर्फ बंकू संजय भोंडवे (वय 4) याला खेळण्यासाठी आरोपीने व त्याच्या अल्पवयीन मुलीने दुपारी सुमारे अडीच वाजता आपल्या घरी बोलावून नेले. संजोगची आई त्याला पाठविण्यास तयार नसतानाही आरोपीने त्याला बळजबरीने सोबत नेल्याचा आरोप आहे. सायंकाळपर्यंत संजोग घरी परतला नाही. त्यामुळे त्याचे आई-वडील व भावाने परिसरात शोधाशोध सुरू केली.
आरोपीच्या घरी चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, शेजार्यांनी संजोग आरोपीच्या घरात गेल्याचे आणि त्यानंतर बाहेर न आल्याचे सांगितले. त्यामुळे नातेवाईक व परिसरातील नागरिक आरोपीच्या घरात शोध घेण्यासाठी गेले. सुरुवातीला आरोपी व त्याच्या मुलीने घरात शोध घेण्यास विरोध केला. शोधादरम्यान घरातील बेडरूममध्ये असलेल्या भूमिगत पाण्याच्या टाकीबाबत संशय आल्याने तिचे झाकण उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यालाही आरोपीने तीव्र विरोध केला. मात्र, उपस्थितांनी झाकण उघडून पाहिले असता टाकीतील पाण्यात संजोगचा मृतदेह आढळून आला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात संजोगचा मृत्यू नाक व तोंड दाबल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास करून आरोपीला अटक केली.
सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील संदीप वाघ यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्यादरम्यान मृत मुलाचे आई-वडील, भाऊ, शवविच्छेदन करणारे डॉक्टर तसेच शोधमोहीमेत सहभागी झालेल्या व्यक्तींसह एकूण 10 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या साक्षी व भक्कम पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी सचिन पिंगळे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार सतीश इंगळे यांनी काम पाहिले.






