Child Kidnapping Case : पुणे रेल्वे स्टेशनवरून १ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण; पोलिसांनी अवघ्या १६ तासांत ‘असा’ लावला छडा
Child Kidnapping Case : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण झालेल्या एका वर्षाच्या बालिकेची बंडगार्डन पोलिसांकडून अवघ्या १६ तासांत सुखरूप सुटका.

Child Kidnapping Case – पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या एका वर्षाच्या बालिकेची अवघ्या १६ तासांत सुटका करत बंडगार्डन पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले. सलग १२ तासांहून अधिक काळ ७० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. मलठण (ता. शिरूर) येथील शिवानी अमोल भोसले (२१) यांचे पतीसोबत भांडण झाल्यानंतर त्या ३० मे रोजी सायंकाळी आपल्या एक वर्षाची मुलगी लीलासह पुणे रेल्वे स्थानक परिसरात आल्या होत्या.
राहण्याची सोय नसल्याने त्या रेल्वे स्थानकातील आरक्षण कार्यालयाजवळील दत्त मंदिरासमोरील मोकळ्या जागेत रात्री झोपल्या. रात्री सुमारे साडेनऊ वाजता त्यांना जाग आली असता, मुलगी जवळ नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला.
सीसीटीव्ही फुटेजमधून माग
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी तपासासाठी तीन विशेष पथके तयार केली. पोलिसांनी रात्री १० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सलग १२ तास पुणे रेल्वे स्थानक परिसरातील ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तपासादरम्यान दोन महिला आणि एक पुरुष मुलीला घेऊन जात असल्याचे दिसून आले.
हे तिघे मुलीसह प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून सुटणाऱ्या पनवेल-नांदेड-पनवेल रेल्वेत बसल्याचे दिसले. त्याआधारे पोलिसांनी तत्काळ दोन पथके रवाना केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौगुले यांच्यासह पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे आणि मनोज भोकरे यांचे पथक दौंड रेल्वे स्थानक परिसरात पोहोचले. त्यांना ३१ मे रोजी दुपारी संशयितांचा शोध लागला.
चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे द्रुपदा लक्ष्मण गायकवाड (३५, रा. सुंदरनगर, जालना), राधा लकी आदिवासी (२०) आणि लकी संदीप आदिवासी (२१) अशी सांगितली. मुलीबाबत विचारणा केली असता त्यांनी पुणे रेल्वे स्थानकातून तिला उचलून आणल्याची कबुली दिली. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर,
सहाय्यक आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे आणि पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौगुले, पोलीस कर्मचारी सारस साळवी, प्रकाश आव्हाड, अमित सस्ते, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.






