Child Friendly Bus: बालकांच्या सुरक्षिततेसाठी चाइल्ड फ्रेंडली बस; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
Child Friendly Bus: बाल हक्क संरक्षण आणि सुरक्षित बालपणाविषयी नागरिकांमध्ये जागृती केली जाणार

पिंपरी – बालकांची सुरक्षितता आणि त्यांच्या हक्कांबद्दल समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकाराने चाइल्ड फ्रेंडली बस उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते या विशेष बसचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ‘विशेष बाल पोलीस पथक’ व ‘होप फॉर दि चिल्ड्रेन फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सांगितले की, बालकांच्या संरक्षणासाठी समाजात संवेदनशील वातावरण निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलांसाठी सुरक्षित आणि बालस्नेही शहर उभारण्यासाठी पोलीस प्रशासन सतत विविध उपक्रम राबवत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस आयुक्तांनी चाईल्ड फ्रेंडली बसला हिरवा झेंडा दाखवून या जनजागृती मोहिमेचा प्रारंभ केला.
या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या शुभांगी तांबट, ‘होप फॉर दि चिल्ड्रेन फाऊंडेशन’च्या संस्थापिका डॉ. कॅरोलीन, पोलीस सह-आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड (गुन्हे), अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली (प्रादेशिक विभाग), पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (गुन्हे) आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अशी असणार ‘चाइल्ड फ्रेंडली बस’ची भूमिका
ही बस पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांत फिरून बाल हक्क संरक्षण आणि सुरक्षित बालपणाविषयी नागरिकांमध्ये जागृती करेल. बालकांशी संबंधित कायदे व त्यांच्या अधिकारांची माहिती सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. बालस्नेही शहर या अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेला हा उपक्रम मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.





