BJP Govt : मुख्यमंत्र्यांची दिल्लीत भेट, मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत! ‘या’ मंत्र्यांना मिळणार नारळ?
BJP Govt : त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

BJP Govt : मध्य प्रदेशातील भाजप सरकारमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात जूनच्या अखेरीस मोठा फेरबदल होऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, ५ ते ६ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, तर ७ ते ८ नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेश राज्यात मोहन यादव सरकार स्थापन झाल्यानंतर हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल असणार आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळात एकूण ३१ सदस्य आहेत. अलीकडच्या काळात मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.( BJP Govt )
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम चर्चा पूर्ण झाली असून २० ते ३० जूनदरम्यान काही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाऊ शकतात. त्यानंतर नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचा स्मार्ट गुंतवणुकीचा निर्णय; घरभाड्यातून महिन्याला मिळणार १६ लाख रुपये
दरम्यान, वरिष्ठ मंत्री कैलाश विजयवर्गीय यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची चर्चा सुरू आहे. तसेच प्रल्हाद सिंग पाटे यांना पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
‘या’ मंत्र्यांना नारळ मिळणार? (BJP Govt)
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्री विजय शाह यांच्यासह पंचायत राज मंत्री राधा सिंह, राज्यमंत्री प्रतिमा बागरी आणि वन राज्यमंत्री दिलीप अहिरवार यांना मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते.
‘या’ चेहऱ्यांना संधी मिळणार? (BJP Govt)
सागर जिल्ह्यातील आमदार शैलेंद्र जैन किंवा प्रदीप लारिया यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच ज्योतिरादित्य सिंधिया यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रमुराम चौधरी आणि माजी मंत्री बृजेंद्र प्रताप सिंह यांच्याही नावांची चर्चा सुरू आहे. युवा, महिला आणि आदिवासी समाजातील प्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देण्यावर भाजपचा भर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडते याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा : Case of poisonous alcohol : नफ्याच्या हव्यासापोटी 18 जणांचा बळी; विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर





