Sanjay Raut : “दिल्लीला अधिकार दिल्यामुळे मुख्यमंत्रीपद लटकून राहिलं”; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल !

Sanjay Raut : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपच्या जागा जास्त असल्याने, त्यांच्याच वाट्याला मुख्यमंत्रीपद जाईल अशी अटकळ बांधली जात आहे.
मात्र शिवसेना नेत्यांकडून सातत्याने एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. अशातच काल राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपाच्या मुख्यमंत्र्याला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिंदे यांनी ही घोषणा करत ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
अश्यातच, आज महायुतीच्या नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावरून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘पूर्ण बहुमत असताना राज्याचं मुख्यमंत्री पद का लटकून पडल आहे हे जनतेला समजत नाही. मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार दिल्लीला दिल्यामुळे दिल्ली ठरवेल की राज्य कोणाच्या हाती द्यायचं.’ असा टोला राऊतांनी लागलाव आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री कोण हे आणखी ठरत नाही. 200 पेक्षा जास्त जागा येऊन पण मुख्यमंत्री ठरत नाही. भाजपला पूर्ण बहुमत असताना राज्याचं मुख्यमंत्री पद का लटकून पडल आहे हे जनतेला समजत नाही. आम्ही आजही मानत नाही की हा जनतेचा कौल आहे. राज्यात नियम कायदे हे फक्त विरोधी पक्षासाठी आहेत.
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदावर दावा कसा असू शकतो हेच समजत नाही. शिवसेना स्वतःला समजनाऱ्यानी पक्षाचे निर्णय दिल्लीतील नेत्यांना दिले असतील. तर तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचे आधिकर नाहीत. मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार दिल्लीला दिल्यामुळे दिल्ली ठरवेल की राज्य कोणाच्या हाती द्यायचं, असं संजय राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘महाविकास आघाडी अजिबात फुटणार नाही. आम्हाला तिघांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल. काही कार्यकर्त्यांची वेगळ लढवी अशी भूमिका असते. लोकसभेला एकत्र लढलो त्याचा फायदा झाला, विधानसभेला का फायदा झालं नाही हे एकत्र बसून ठरवू. भविष्याचा विचार करता आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. हे जिंकले त्यांची ही भूमिका नाही. जे पराभूत झाले आहेत त्यांना अस वाटणं चूक नाही. भविष्यात काय होईल ते बघू, स देखील ते यावेळी म्हणाले.
विनोद तावडेंची अमित शहांसोबत बैठक
आज महायुतीच्या नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या बैठकीला विनोद तावडेंनी देखील उपस्थित राहावं असे आदेश त्यांना अमित शहांकडून देण्यात आले आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात तावडे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाल्याची माहिती देखील मिळते आहे. राज्यातील परिस्थिती पाहता मुख्यमंत्री कोण असावा? यावर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळं आज होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी तावडे-शहा यांच्यातील चर्चेला महत्व आहे.





