महसूलमंत्र्यांच्या रणनीतीला मुख्यमंत्र्यांची रसद 

संदीप राक्षे
सातारा  – पश्‍चिम महाराष्ट्रातील महापुराच्या अस्मानी संकटाचे अग्निदिव्य पार पाडल्यानंतर भाजपने पुन्हा महाजनादेश यात्रेचे 22 ऑगस्टपासून नियोजन सुरू केले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यात आपत्ती निवारणाच्या निमित्ताने या तीन जिल्ह्याची महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली तरी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातारा जिल्ह्यावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. सातारा शहराच्या हद्दवाढीसह आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनांची रखडलेल्या अनुदानांची तिजोरी काही राजकीय घडामोडीनंतर सैल होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

भाजपने राष्ट्रवादीला नामोहरम करण्यासाठी दिग्गज आपल्याकडे खेचण्याची मोठी खेळी केली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे पाच, कॉंग्रेसचे दोन व सेनेचा एक आमदार निवडून आला होता. गेल्या पाच वर्षात झपाट्याने राजकीय संदर्भ बदलल्याने साताऱ्यात भाजपने पवारांवर राजकीय दबावतंत्राचा यशस्वी प्रयोग केला आहे.

सातारा व फलटण विधानसभा ही दोन महत्वाची सत्ताकेंद्र आपल्याकडे वळवण्याचा भीमपराक्रम भाजप ने करत एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. रामराजे नाईक निंबाळकरांच्या अटीशर्तीवर भाजपच्या हायकमांडमध्ये जोरदार खलबते सुरू असल्याची माहिती भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे यांच्या भाजप प्रवेशाने येथील राजकीय संदर्भ बदलले असून खासदार उदयनराजे यांच्या राजकीय चुप्पीचे प्रचंड आश्‍चर्य आहे. उदयनराजेंच्या बच्चन स्टाईल धक्का तंत्रावर शिवेंद्रसिंहराजेंना लक्ष ठेवावे लागणार आहे. दीपक पवार व अमित कदम यांच्या गळाभेटी वाढल्या तरी शिवेंद्रराजेंना अद्याप संपर्क झालेला नाही. भाजपला हा सवतासुभा परवडणारा नाही मात्र शिवेंद्रसिंहराजे यांचे राजकीय कसब वादातीत असल्याने ती अडचणं होणार नाही. फलटणच्या रामराजेंना वाई मतदारसंघाचा मोह पडल्याने मदन भोसले यांची अडचणं होऊ शकते. राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांचे राजकीय भवितव्य महाबळेश्‍वरातील “राजकीय भूकंपा’मुळे पणाला लागणार आहे. वाईत सध्या तरी मदन बाणाची चलती असून रामबाणाचा प्रयोग होणार का? याचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे.

फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव असून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची राजकीय गणित आमदार जयकुमार गोरे यांच्या सल्ल्याने चालणार त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण यांची अडचणं होणार आहे. शिवसेनेकडून दिगंबर आगवणे येथून इच्छुक आहेत. माणच्या राजकारणाने जयकुमार गोरे हटावचा नारा दिला असला तरी जयकुमार वेगळ्याच धक्का तंत्राच्या मूडमध्ये आहेत. युतीच्या संकेताप्रमाणे माण मतदारसंघ सेनेच्या वाटयाला असून सेनेत प्रवेश केलेल्या शेखर गोरे यांनी तेथून तयारी सुरू केली आहे.

कोरेगावात भाजपचे महेश शिंदे व राष्ट्रवादी पक्ष प्रतोद शशिकांत शिंदे यांची प्रमुख लढत आहे. मात्र साताऱ्यातून लढतीचे आदेश शिंदे यांना मिळाल्यास कोरेगावात राष्ट्रवादी वेगळे कार्ड खेळू शकते. कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील व मनोज घोरपडे कराड दक्षिणमध्ये कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण भाजपचे नेते अतुल भोसले, विलास काका उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांच्यात लढतीची शक्‍यता आहे.

पाटणमध्ये देसाई पाटणकर या पारंपारिक लढतीला यंदासुद्धा पर्याय नसणार. दीड महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी आम्ही एक आहोत चा नारा दिला होता मात्र राजे गट भाजपकडे गेल्याने राष्ट्रवादीच्या वाड्यात आमदारांची संख्या घटली आहे. सातारा, फलटण, वाई व कराड दक्षिण या चार मतदारसंघात चमत्कार घडवण्याचे पक्के मनसुबे महसूलमंत्र्यांचे असून महाजनादेशच्या निमित्ताने राजकीय रसद दिली जाणार आहे.

चिरेबंदी वाड्यात आमदार आहेत ना?

विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाच्या घडामोडीवरच सातारा जिल्ह्याचे राजकारण पुढे सरकणार आहे. सातारा जिल्ह्यातून चार आमदार निवडून आणायचे या महसूल मंत्र्यांच्या उद्दिष्टाला ताकत देणाऱ्या राजकीय हालचाली घडवून आणण्यात सातारा ते फलटण असा मोठा पल्ला भाजपने आपल्या कवेत आणला आहे. राष्ट्रवादीची मोठी अर्थवाहिनी असणाऱ्या सातारा जिल्हा बॅंकेत आधी शिवेंद्रसिंहराजे भोसले व आता रामराजे नाईक निंबाळकर यांना गळाला लावत भाजपने पवारांच्या सत्ता स्थानांना धक्के द्यायला सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी सातारा जिल्ह्याला टप्याटप्याने दहा हजार कोटींचा बोनस रस्त्यांसाठी जाहीर करत लोकसभा निवडणुकीत मोठी बाजी मारली होती. आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या दिग्गजांचे भाजपप्रवेश आणि जिल्ह्यात पाच राज्यमंत्रीपदे हा मुख्यमंत्र्यांच्या धोरणात्मक रणनीतीचा भाग आहे.

साताऱ्यात रखडलेल्या विकास कामांच्या पूर्ततेसाठी आता शिवेंद्रसिंहराजे यांच्या शब्दाला वजन आले असून हद्दवाढीनंतर सातारा शहराच्या राजकारणातही मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत आहेत. जिल्ह्यातील एकवीसशे बूथरचनेतून भाजपने तब्बल सव्वादोन लाख सभासद गोळा केले आहेत ही भाजपसाठी राजकीय दृष्ट्या मोठी रसद असणार आहे. पुणे ते कोल्हापूर या पट्ट्यात चंद्रकांत दादांची रणनीती अंतिम असली तरी सातारा जिल्ह्याची मध्यवर्ती भौगोलिक रचना व राजकीय संवेदनशीलता नाकारून चालणार नाही. थोरल्या पवारांचे मूळ नांदवळ (कोरेगाव) असल्याने बारामतीनंतर सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची जिरवायची हा भाजपचा पक्का मनसुबा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)