ई कॅबिनेट सुरू करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय; मात्र नेटच उपलब्ध नाही

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ई कॅबिनेट सुरु करण्याचा निर्णय केला असला तरी कॅबिनेट समितीच्या दालनांत नेटच उपलब्ध होत नाही अशी तक्रार आज बैठकीत उपस्थित तीन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी करत मुख्य सचिवांसह उपस्थित कर्मचाऱ्यांना धारेवर धरल्याचे सनसनाटी वृत्त मंत्रालयात पसरल्याने मंत्रालयीन कर्मचारी वर्ग चिडीचूप झाला.
राज्य मंत्रिमंडळातील बैठकीनंतर कामकाज पत्रिकेवरील सर्व विषय उरकताच मंत्र्यांनी मंत्रालयात दालनांत नेट उपलब्ध होत नसल्याची तक्रार करत ई कॅबिनेटचा विषय छेडला. कॅबिनेट बैठका असो किंवा ऐनवेळी बैठकींसाठी साधावयाचा संवाद असेल, मंत्री समिती कक्षांतील नेट तेवढ्यावेळेपुरतेच मुश्किलीने मिळते अशी तक्रार भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना मंत्री करु लागल्याचे सांगण्यात आले.
यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांचे म्हणणे मांडल्यानंतर माहिती व तंत्रज्ञान सचिवांच्या संबंधित वक्तव्याचा अपवाद वगळता तंत्रज्ञानाची जाण असलेले अधिकारी समजावण्यासाठी येताच तंत्रज्ञानाची थोडीफार जाण असणारे मंत्री गुश्श्यातच गुरगुरले. त्यांनी मग नेट मिळवण्यासाठी किती आटापिटा करावा लागतो.तेही पाढे पच्चांवन वाचल्याची चर्चा मंत्रालय परिसरातील कर्मचारी वर्गात थव्याथव्याने होऊ लागली होती.
भाजपाच्या प्रमुख मंत्र्यासह,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभ्यासू मंत्री उदय सामंत आदिंनी या चर्चेत भाग घेत मंत्रालयातील नेट समस्यांचे त्यांचे अनुभवही सर्वांबरोबर शेयर करत माहिती व तंत्रज्ञान कर्मचारी वर्गाला अक्षरश: फैलावर घेऊन सर्वांची भंबेरी उडवल्याचे सांगितले जात आहे.
अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करत चर्चेचा सूर बिघडू नये म्हणून विषय बंद करत पडदा टाकला व यापुढे मंत्री दालन असो वा समिती कक्ष किंवा कॅबिनेट हॉल मंत्र्यांनी आरक्षित केल्यानंतर नेट मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून तांत्रिक अडचणींमुळे मंत्र्यांची गैरसोय होऊ नये असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.





