Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या हालचाली सुरू असून भाजप आता अजित पवार गटालाही धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Maharashtra Politics) माहितीनुसार, पुण्यात रवींद्र चव्हाण यांच्यासोबत दिलीप मोहिते पाटील यांची जवळपास तासभर बंद दाराआड बैठक झाली. संजय जगताप यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत आगामी निवडणुका, खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे आणि पुढील रणनीतीवर चर्चा झाल्याचे समजते. अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या मोहिते पाटील यांनी भाजप नेत्यांसोबत केलेल्या या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. (Maharashtra Politics) दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वीच त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू होत्या. पक्षांतर्गत निर्णयप्रक्रियेत आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्यामुळे ते नाराज असल्याची माहितीही समोर येत आहे. समरजितसिंह घाटगे यांचाही भाजपमध्ये प्रवेश दरम्यान, कोल्हापूर येथे समरजितसिंह घाटगे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय परिस्थिती आणि जिल्ह्यातील नव्या समीकरणांचा अंदाज घेत घाटगे यांनी पुन्हा भाजपची वाट धरल्याचे मानले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, अजित पवार गटाला हा मोठा धक्का ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)