मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमांना वर्षा बंगल्यावर बोलावलं, कदम-कीर्तिकर वाद मिटणार?

मुंबई : ऐन दिवाळीत शिवसेनेतील दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये टोकाचा वाद पहायला मिळत आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघासाठी रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. दोघांमधील वादाने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. गजानान कीर्तिकर यांनी आपल्या बायकोशी गद्दारी केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. मात्र गजानन कीर्तिकर यांनी सर्व आरोप फेटाळत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यादरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना वर्षा बंगल्यावर बोलवले आहे. सायंकाळी ६ वाजता रामदास कदम आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट होणार आहे. कदम – कीर्तीकर यांच्यातील टोकाच्या मतभेदामुळे शिंदे गटात फुटीची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री शिंदे ही परिस्थिती कशी सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रामदास कदम यांनी केलेले आरोप मला मान्य नाहीत – कीर्तीकर
गजानन कीर्तीकर म्हणाले की, रामदास कदम यांनी केलेले आरोप मला मान्य नाहीत. ते आरोप करत असल्यामुळे मी प्रति आरोप करणं मला मान्य नाही. मी माझ्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे माझी बाजू मांडली आहे. आम्ही दोन्ही ज्येष्ठ आहोत. त्यामुळे आम्ही असे वागलो, तर इतर शिवसैनिकांकडे चांगला मेसेज जाणार नाही. परंतु मुख्यमंत्र्यानी आम्हाला दोघांना एकत्र बसवून चर्चा केली तर मी भूमिका मांडेन. माझ्यासाठी विषय संपला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन रामदास कदम यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. मी माझी भूमिका काल स्पष्ट केली आहे. मला जे काही सांगायचे होतं ते मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. मला पुन्हा बोलवलं तर आम्ही तिघे एकत्र बसून चर्चा करून याप्रकरणी मार्ग काढू, अशी स्पष्ट भूमिका गजानन कीर्तिकर यांनी मांडली.
रामदास कदम काय म्हणाले?
गजानान कीर्तिकर यांनी आपल्या बायकोशी गद्दारी केल्याचा आरोप करताना पुण्यात शेण खायला का जाता?, असा सवाल करत रामदास कदम यांनी त्यांची पर्सनल लाईफ काढली. तसेच कीर्तिकरांचं वस्रहरण केलं तर त्यांना महिला मत देणार नाहीत. महिला त्यांना चपलेने मारतील. पुण्यात काय आहे, हे जर सांगितलं तर गजनान कीर्तिकरांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे वक्तव्य रामदास कदम यांनी केले होते.
नेमका वाद काय आहे ?
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम आमने-सामने आले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे संकेत आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात सध्या गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत. मात्र कीर्तिकर त्यांच्या आजारपणामुळे ते निवडणुक लढणार नसल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यानंतर रामदास कदम यांनी त्यांचे चिरंजीव सिद्धेश कदम यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यावरुनच आता गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.




