Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी शिवसेनेच्या ‘या’ ४ दिग्गजांची नावे चर्चेत, शिंदेंची पसंती कुणाला?
Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी शिवसेना (शिंदे गट) मध्ये उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर, राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांची नावे चर्चेत
Rajya Sabha Election : महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठविण्यात येणाऱ्या जागेसाठी शिवसेना (शिंदे गट) मध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गजानन कीर्तीकर शिंदेंच्या भेटीला
शिवसेना (शिंदे गट) चे ज्येष्ठ नेते व माजी खासदार गजानन कीर्तीकर हे येत्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पक्षातील दीर्घ अनुभव, संघटनात्मक काम आणि विविध पदांवरील जबाबदाऱ्या लक्षात घेता राज्यसभेसाठी आपली निवड व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम केल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
सध्या ते गोवा राज्य संपर्कनेते तसेच स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
कौटुंबिक नात्यांपेक्षा पक्षनिष्ठा
लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे शिवसेना (ठाकरे गट) कडून निवडणूक रिंगणात असताना गजानन कीर्तीकर यांनी शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार केला होता. कौटुंबिक नात्यांपेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य दिल्यामुळे त्यांच्या भूमिकेची विशेष चर्चा झाली होती.
राहुल शेवाळे, संजय निरुपमही इच्छुक
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) कडून राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांचीही नावे राज्यसभेसाठी इच्छुक म्हणून चर्चेत आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.
अंतिम निर्णय शिंदेंच्या हाती
राज्यसभेच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, पुढील काही दिवसांत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पक्षनिष्ठा, संघटनात्मक अनुभव आणि राजकीय समीकरणे या सर्व घटकांचा विचार करूनच उमेदवारीचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




