Goa CM : शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa CM) पार्श्वभूमीवर एक मोठे आणि आक्रमक विधान केले आहे. येत्या २०२७ मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार असून, फक्त निवडणूक लढवणारच नाही तर मुख्यमंत्री (Goa CM) पदही शिवसेनेच्या वाट्याला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कीर्तिकर यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित शिवसेना गोव्यात स्थापन झाली असून, त्याला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. “आम्ही गोव्यात शिवसेना मजबूत करत आहोत. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरणार आहोत. इथे आम्ही फक्त जागा जिंकणार नाहीत तर मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच बनवणार आहोत,” असा दावा त्यांनी केला. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही आणि येत्या काळात त्याबाबत स्पष्टता येईल, असेही त्यांनी नमूद केले. गोव्याच्या स्थानिक जनतेच्या मुद्द्यांवर बोलताना कीर्तिकर यांनी तीव्र टीका केली. “गोव्यामध्ये बाहेरचे लोक सत्ता गाजवत आहेत. गोव्याच्या स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, त्यांच्यावर अन्याय होत आहे. स्थानिकांना प्राधान्य मिळायला हवे,” असा आरोप त्यांनी केला. हे विधान गोव्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले असून, शिवसेना शिंदे गट गोव्यात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावरून समजत आहे. दरम्यान, कीर्तिकर यांनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली. मध्यपूर्वेतील युद्ध आणि तणावामुळे जगभरात तेल आणि इंधनाच्या किमती वाढत असून, त्याचा परिणाम भारतातही एलपीजी गॅसच्या तुटवडीच्या स्वरूपात जाणवत आहे. “युद्धामुळे व्यापारी भाववाढ करत आहेत. जगभरातील तणावाचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे,” असे त्यांनी म्हटले. शिवसेना शिंदे गटाने गोव्यात राज्य संपर्कनेते म्हणून गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती केली असून, ते गोव्यात पक्ष विस्तारासाठी सक्रिय आहेत. २०२७ च्या निवडणुकीत गोव्यातील ४० जागांवर शिवसेना किती यश मिळवते आणि मुख्यमंत्री कोण होईल, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. हे विधान भाजप आणि इतर पक्षांसाठी आव्हान ठरू शकते, कारण गोवा सध्या भाजपच्या नेतृत्वाखाली आहे.