मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना अटक

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना शनिवारी अटक करण्यात आली. आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
दिल्ली पोलीस दुपारच्या सुमारास केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी पोहचले. तिथे कुमार यांना ताब्यात घेण्यात आले. अटकेमुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचे मानले जात आहे. मालिवाल १३ मे यादिवशी केजरीवाल यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. त्यावेळी कुमार यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप मालिवाल यांनी केला. त्या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
कुमार यांनी लाथा आणि थपडा मारल्याचा दावा मालिवाल यांच्याकडून करण्यात आला. त्यांची शुक्रवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर जारी करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार मालिवाल यांच्या डाव्या पायाला आणि उजव्या गालाला मार लागला आहे.





