Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये मोठी चकमक 3 नक्षलवादी ठार

सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह तीन नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुकमा पोलीसांनी पीटीआयला सांगितले की, गोलापल्ली पोलीस स्टेशन परिसरातील एका डोंगरावर सकाळी गोळीबार सुरू झाला, जेव्हा जिल्हा राखीव दलाचे एक पथक या भागात माओवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध मोहिमेवर होते.
आतापर्यंत चकमकीच्या ठिकाणाहून एका महिलेसह तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. ही मोहीम सुरू असून पुढील तपशिलाची प्रतीक्षा आहे. या ताज्या कारवाईमुळे, या वर्षी आतापर्यंत छत्तीसगडमध्ये चकमकींमध्ये २८४ नक्षलवादी ठार झाले आहेत.
त्यापैकी, सुकमा, विजापूर आणि दंतेवाडा या सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर विभागात २५५ जणांना कंठस्नान घालण्यात आले, तर इतर २७ जण रायपूर विभागात येणाऱ्या गरियाबंद जिल्ह्यात मारले गेले. दुसरीकडे, दुर्ग विभागातील मोहला-मानपूर-अंबागड चौकी जिल्ह्यात दोन नक्षलवादी ठार झाले.





