छत्रपती संभाजीराजेंची पत्नीसाठी भावनिक पोस्ट; “आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला साथ देणाऱ्या…’

कोल्हापूर – माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे सर्वेसर्वा संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या पत्नीला एक भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्या पत्नीला ‘संयोगिताराजे’ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे साथ देणाऱ्या पत्नीचे कौतुक देखील त्यांनी केलं आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या सोशल मीडियावर हे पत्र शेअर केलं आहे. संयोगिताराजे छत्रपती या नेहमीच प्रत्येक आघाडीवर संभाजीराजे यांना साथ देताना दिसतात. आंदोल असो किंवा आमरण उपोषण संयोगिताराजे आपल्या पतीसोबत शेवटपर्यंत ठाण मांडून असल्याचं नेमीचं दिसून आलं आहे.
संभाजीराजे छत्रपती आपल्या पत्रात म्हणतात….
“माझ्या जीवनाशी एकरूप होऊन, प्रत्येक क्षणाला साथ देणाऱ्या युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा आज वाढदिवस !
महिन्यातील बहुतांश दिवस स्वराज्य संघटना विस्ताराच्या व विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मी महाराष्ट्रभर फिरत असतो, तेव्हा माझ्या मागे त्या संपूर्ण परिवाराची काळजी घेतात. परिवारासोबतच कार्यकर्त्यांचीही त्या काळजी घेतात. कुठेही माझी अनुपस्थिती जाणवू देत नाहीत. 6 जून रोजी दुर्गराज रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक महोत्सव असो वा दिल्लीतील शिवजयंती असो, सर्व कार्यक्रमांमध्ये हिरीरीने पुढाकार घेऊन अत्यंत सूक्ष्म नियोजन करून कोणताही कार्यक्रम विना अडथळा यशस्वी करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे.
सर्वांना सोबत घेऊन, सर्व बारकावे टिपून परिपूर्ण नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे कोणताही कार्यक्रम विनासायास व शिस्तबध्दरित्या संपन्न होतो. त्यांच्या या सहर्ष योगदानामुळे माझा खूप मोठा ताण कमी होतो व सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे मी निर्धास्त राहू शकतो. आजवर जीवनात आलेल्या प्रत्येक चढउतारामध्ये त्यांनी मला खंबीरपणे मला साथ दिली. प्रत्येक कार्यात स्वतःला झोकून देवून सतत मला पाठबळ देण्याचं कार्य त्या करत असतात. त्यांना आरोग्यमय दिर्घायुष्य लाभो हिच जगदंबे चरणी प्रार्थना..!”





