पिंपरी | छत्रपतींनी संघर्षातून सुराज्यस्थापन केले

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – छत्रपतींनी अठरा पगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन संघर्षातून सुराज्य स्थापन केले. शिवरायांनी पन्नास वर्षांत अनेक किल्ले बांधले. मात्र, कोणत्याही किल्ल्याला स्वत:चे नाव दिले नाही. नियोजन काय असते याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने कै. कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेंतर्गत शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक राष्ट्रोत्सव’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा.बानगुडे बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, उमाकांत कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, पं. सुरेश साखवळकर, माजी नगरसेवक गणेश काकडे, निखिल भगत, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, संग्राम जगताप, सुदर्शन खांडगे, प्रा. प्रमोद बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
प्रा. बानगुडे पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या बालपणा पासून राज्याभिषेका पर्यत महाराजानाच्या कुशल, धुरंधर, समाज सुधारणा, रयतेचे नेतृत्वाच्या अनेक पैलूचे मत व्याख्यानातून मांडले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद निकम यांनी, तर आभार राजेश बारणे यांनी मानले.
सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या अभ्यासिकेत अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या ओंकार विजय डोके (कनिष्ठ अभियंता पी.डब्लु.डी), सचिन लोखंडे (वरिष्ठ सहाय्यक लेखापाल जिल्हा परिषद कोल्हापूर) व प्रणव भेगडे (सी.डी.एस.) यांचा प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.





