Chhath Mahaparva: छठ महापर्वाला सुरुवात; उत्तर भारतीय नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण
सूर्योपासनेसह सामाजिक एकोपा आणि बंधुभाव जपणारा सण

पिंपरी – उत्तर भारतीय बांधवांच्या श्रद्धेचा, भक्तिभावाचा आणि निसर्गपूजेचा महत्त्वाचा सण असलेल्या छठ महापर्वाला सुरुवात झाली आहे.
चार दिवस चालणाऱ्या या पर्वानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील उत्तर भारतीय नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सूर्यदेव आणि छठी मातेची पूजा करण्यासाठी भाविकांची तयारी सुरू झाले असल्याते चित्र दिसत आहे.
छठ महापर्वाची सुरुवात गुरुवारी (दि. १३) नहाय-खाय या विधीने झाली. या दिवशी व्रत करणारे भाविक स्नान करून घराची स्वच्छता करतात. तसेच सात्त्विक भोजन ग्रहण करून पर्वाला सुरुवात करतात. शुक्रवारी (दि. १४) खरना विधीने ३६ तासांचे निर्जळी व्रत सुरू झाले आहे.
रविवारी (दि. १५) मावळत्या सूर्याला सायंकाळी अर्घ्य दिले जाणार आहे, तर सोमवारी (दि. १६) उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून या महापर्वाची सांगता होईल.
निसर्गाजवळ नेणारे व्रत
छठपूजा हा केवळ धार्मिक विधी नसून उत्तर भारतीय नागरिकांच्या श्रद्धा आणि परंपरेशी जोडलेला महत्त्वाचा सण आहे. या महापर्वाचे वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाशी असलेले त्याचे नाते! इतर अनेक सणांप्रमाणे या पर्वात मंत्रोच्चार, श्लोक किंवा विशिष्ट कर्मकांडांना फारसे स्थान नसते.
निसर्गातील घटकांना साक्षी मानून सूर्यदेवाची उपासना केली जाते. पाणी, पृथ्वी, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांशी माणसाचे असलेले नाते या पर्वातून अधोरेखित होते.
मावळत्या सूर्यालाही नमन
विशेष म्हणजे छठपूजेमध्ये केवळ उगवत्या सूर्याचीच नव्हे, तर मावळत्या सूर्याचीही पूजा केली जाते. रविवारी सायंकाळी जलाशयात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्घ्य दिले जाईल. त्यानंतर सोमवारी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केले जाईल.
सूर्य हा ऊर्जा आणि जीवनाचा स्रोत असल्याने त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आहे. पूजेसाठी फळे, ऊस, नारळ आणि विविध नैवेद्यांचा वापर केला जातो. व्रतादरम्यान स्वच्छता, शुद्धता आणि सात्त्विकतेला विशेष महत्त्व दिले जाते.
सामाजिक एकोपा जपणारा लोकोत्सव
छठ महापर्व हे केवळ धार्मिक श्रद्धेपुरते मर्यादित नसून समाजात एकोपा, बंधुभाव आणि सामूहिकतेची भावना जपणारे पर्व म्हणूनही ओळखले जाते. या सणानिमित्त कुटुंबीय, नातेवाईक आणि समाजातील नागरिक एकत्र येतात. घाटांवर सामूहिकरीत्या पूजा केली जाते.
पूजेच्या तयारीपासून ते घाटावरील व्यवस्थेपर्यंत नागरिक एकमेकांना सहकार्य करतात. कामानिमित्त आपल्या मूळ गावापासून दूर शहरात स्थायिक झालेल्या उत्तर भारतीय बांधवांना या पर्वाच्या निमित्ताने आपल्या संस्कृतीशी आणि परंपरांशी जोडले राहण्याची संधी मिळते. श्रद्धा, निसर्गाप्रती कृतज्ञता आणि सामाजिक एकोपा जपणारा सण म्हणून छठ महापर्वाचे विशेष महत्त्व आहे.




