जळगाव : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेली रस्सीखेच अजूनही सुरुच आहे. स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान रायगडमध्ये आदिती तटकरेंना तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांना मिळाला होता. त्यामुळे महायुतीतील इतर घटक पक्ष नाराज असल्याचे देखील बोलले जात होते. त्यातच मंत्री छगन भुजबळ जळगाव येथे आले असता, त्यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरायला हवा, यासंदर्भात मी अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंशी बोलणार असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात आमचे एकूण सात आमदार आहेत. एवढी पक्षाची ताकद असताना देखील आम्ही पालकमंत्रीपदसाठी अजूनही आग्रह केला नाही. रायगडमध्ये आमचा आदिती तटकरे यांच्या रुपाने केवळ एक आमदार आहे. असे असून देखील आम्ही रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहोत. मग नाशिकमध्ये तब्बल सात आमदार असूनही याबाबत आम्ही आग्रही नाहीत. त्यामुळे मी या संदर्भात, अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी बोलणार आहे. ते पुढे म्हणाले की, पालकमंत्री कुणालाही होवू द्या, हा महत्त्वाचा मुद्दा नाही. सात आमदार एखाद्या पक्षाचे असतील तर त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे. मात्र, या संदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो सर्वांना बंधनकारक असेल. पालकमंत्रिपदासाठी आपण कोणत्याही प्रकारे आंदोलन केले नाही, की पोस्टर जाळलेले नाहीत, असा टोलाही त्यांनी रायगडातील वादावरून लगावला.