बीड : ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी बीड येथे महामेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रथम शेतकर्यांना मदत व्हावी यादृष्टीने हा महामेळावा काही कालावधीसाठी स्थगित करण्यात करण्यात येत असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओद्वारे ओबीसी बांधवांना माहिती दिली आहे. तसेच प्रथमतः अतिवृष्टी बाधीत शेतकर्यांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सकल ओबीसी समाज बांधवांना केले आहे. छगन भुजबळ यांनी म्हटले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्याकडून बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर २८ सप्टेंबर रोजी हा ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सकल ओबीसी बांधवांनी विशेष मेहनत देखील घेतली. परंतु राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि विशेषत: बीड शहर व जिल्ह्यामध्ये झालेली अतिवृष्टी व शेतकर्यांच्या प्रचंड नुकसानामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला असून त्या मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.