Beed News : बीडमध्ये भर गर्दीत रक्तरंजित थरार.! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या

Beed – बीडमधील पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश याची गुरुवारी मध्यरात्री हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही हत्या वाढदिवस साजरा करताना झालेल्या वादाच्या पूर्ववैमानस्यातून केल्याचा प्राथमिक तपासातून दिसून येत आहे. यश हा २२ वर्षाचा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.
वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या तरुणाच्या हत्येने बीड पुन्हा हादरले असून या घटनेने जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मिळालेल्या माहितीनुसार, महिन्याभरापूर्वी यश आणि त्याचा मित्र सुरज काटे या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झाले.
या वादाच्या पूर्ववैमानस्यातून सुरज काटेने धारदार शस्त्राने वर्दळीच्या ठिकाणी यशचा खून केला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्य झाला.
यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.





