नेवासा: राशीन येथील महात्मा फुले फलक विटंबनेचा निषेध; दोषींवर कारवाईची मागणी

नेवासा : कर्जत तालुक्यातील राशीन ग्रामपंचायतीने ठरावानुसार उभारलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फलकाची काही समाजकंटकांनी तोडफोड करून विटंबना केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत सावता परिषद, समता परिषद आणि सकल ओबीसी समाज, नेवासा तालुक्याच्या वतीने नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात महात्मा फुले यांचे विचार पुसण्याचा प्रयत्न काही जातीयवादी घटक सातत्याने करत आहेत. २०१४ मध्ये राशीन ग्रामपंचायतीने गावातील चौकात उभारलेल्या फुले यांच्या फलकाची अलीकडेच तोडफोड आणि विटंबना करण्यात आली. यामुळे राज्यभरातील फुले अनुयायांच्या भावना दुखावल्या असून, समाजात प्रक्षोभ निर्माण झाला आहे. या कृत्यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.
दोषींवर त्वरित मोकाअंतर्गत कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. तसेच, जातीय सलोखा बिघडवणाऱ्या समाजकंटकांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदन देताना नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव उपस्थित होते. यावेळी सावता परिषद व समता परिषदेचे प्रदेश महासचिव राहूल जावळे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल फुलसौदर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन दरवडे, तालुकाध्यक्ष शरद तांबे, सोशल मीडिया प्रमुख ऋषिकेश तुपे, सागर पुंड, संदिप पुंड, अरुण फुलसौदर, दिनेश व्यवहारे, प्रदीप वडगे, संतोष दरवडे, महादेव पुंड, बाबासाहेब गायकवाड, माऊली कन्हेरकर, कैलास गवळी, सतीश सरोदे (लहुजी सेना), जावेद शेख, रंगनाथ धाडगे, संदिप नारळे, विजय पुंड यांच्यासह सावता परिषद आणि समता परिषदेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.





