Cheteshwar Pujara Retirement : ‘…म्हणून क्रिकेटला अलविदा केला’, चेतेश्वर पुजाराने निवृत्तीबद्दल केला खुलासा

Cheteshwar Pujara’s retirement revealed : रविवार, 24 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ राहिलेल्या दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नव्हे, तर देशांतर्गत क्रिकेटलाही त्याने पूर्णपणे अलविदा करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या पुजाराच्या पुनरागमनाच्या आशा धूसर होत्या, तरीही त्याने निवृत्तीचा विचार केलेला नव्हता. मात्र, आता त्यानी खुलासा केला की, अवघ्या एका आठवड्यापूर्वीच त्याच्या मनात निवृत्तीचा विचार आला आणि त्याने हा निर्णय तातडीने घेतला.
पुजाराचा सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा –
भारतीय संघात दीर्घ काळ तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पुजाराने रविवारी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. या पोस्टमध्ये त्याने भारतीय संघ, सहखेळाडू, बीसीसीआय, राज्य क्रिकेट संघटना आणि चाहत्यांचे दीर्घकाळ पाठिंब्यासाठी आभार मानले. पुजारा म्हणाला की, भारतीय संघासाठी खेळण्याचं त्याचं बालपणीचं स्वप्न पूर्ण झालं. या स्टार फलंदाजाने भारतासाठी 103 कसोटी सामने खेळले, यापैकी शेवटचा सामना जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होता.
चेतेश्वर पुजाराने निवृत्तीबद्दल केला खुलासा –
Wearing the Indian jersey, singing the anthem, and trying my best each time I stepped on the field – it’s impossible to put into words what it truly meant. But as they say, all good things must come to an end, and with immense gratitude I have decided to retire from all forms of… pic.twitter.com/p8yOd5tFyT
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) August 24, 2025
निवृत्तीच्या घोषणेनंतर एका मुलाखतीत पुजाराने सांगितलं की, एका आठवड्यापूर्वीच त्याच्या मनात निवृत्तीचा विचार आला आणि तेव्हापासून तो याबाबत विचार करत होता. पुजारा म्हणाला, “यापूर्वी मी याबाबत फारसा विचार केला नव्हता. पण गेल्या आठवड्यापासून मी यावर विचार करत होतो की, हाच योग्य क्षण आहे. त्यामुळे आज जेव्हा मी हा निर्णय घेतला, तेव्हा हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारतीय संघासाठी खेळणं हे माझं बालपणीचं स्वप्न होतं आणि जेव्हा ते पूर्ण झालं, तेव्हा हा प्रवास दीर्घकाळ चालला.”
पुजारा सौराष्ट्राकडून रणजी ट्रॉफी खेळणार होता, पण…
It is a proud moment for me to have represented India for so many years. Many people have contributed to my journey: #CheteshwarPujara on his retirement from all forms of Indian cricket@cheteshwar1 pic.twitter.com/jnYN2EtbjK
— All India Radio News (@airnewsalerts) August 24, 2025
विशेष म्हणजे, पुजाराच्या या खुलाशातून असं दिसतं की, दुलीप ट्रॉफी 2025 साठी पश्चिम क्षेत्राच्या संघात त्याला स्थान न मिळाल्याचा परिणाम त्याच्या या निर्णयावर झाला असावा. यानंतर अशीही बातमी आली होती की, पुजारा सौराष्ट्राकडून रणजी ट्रॉफी हंगाम खेळण्यासाठी उपलब्ध असेल, परंतु त्यापूर्वीच त्याने निवृत्ती जाहीर केली. यामागचं कारण स्पष्ट करताना पुजारा म्हणाला, “सुरुवातीला मी रणजी ट्रॉफी खेळण्याचा विचार करत होतो, पण नंतर मला वाटलं की, जर तरुण खेळाडूंना संधी मिळाली, तर ते लवकर तयार होतील. म्हणून हा माझा वैयक्तिक निर्णय होता.”पुजाराच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटच्या एका युगाचा अंत झाला असून, चाहत्यांना त्याच्या दीर्घ आणि प्रेरणादायी कारकिर्दीच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.





