उंब्रजच्या उड्डाणपुलाची व्यावहारिकता तपासा

कराड -उंब्रज, ता. कराड या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या भरावपूल असून त्याठिकाणी पारदर्शक उड्डाणपूल होणे अत्यावश्यक असल्याची मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे भागातील नागरिकांनी केली होती. त्यांच्या विनंतीनुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्र, ईमेल व फोनवरून उंब्रजला पारदर्शक (सेगमेंटल) उड्डाणपूल होण्याची गरज असल्याचे सांगून चर्चा केली होती. त्यानुसार नितीन गडकरी यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्राला उत्तर देऊन उंब्रज येथे मागणी केलेल्या पारदर्शक पुलाची व्यावहारिकता तपासून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला असल्याचे पत्र पाठविले आहे.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांनुसार कराड व मलकापूर येथील जुना भराव उड्डाणपूल पाडून नवीन पारदर्शक उड्डाणपूल बांधण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार जुना भराव उड्डाणपूल पडून नवीन पूल बांधण्याचे काम सुरु आहे. याच धर्तीवर उंब्रज येथील जुन्या भराव उड्डाणपुलामुळे उंब्रज शहराचे दोन भाग झाले असून पुलाच्या बाजूला अरुंद सेवा रस्ता झाल्याने येथे नित्याचीच वाहतूक कोंडी होत आहे. तसेच येथील बाजारपेठेचेही अतोनात नुकसान होत आहे. तर याच रस्त्यावर असलेले बस स्थानक वापरा अभावी पडून आहे. येथील नागरिक बस पकडण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर धोकादायकरित्या उभा राहतात. त्यामुळे अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत.
या सर्व गैरसोयींबद्दल स्थानिक नागरिकांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन उंब्रज येथील भराव उड्डाणपूल पाडून कराडच्या धर्तीवर सेगमेंटल म्हणजेच पारदर्शक पद्धतीचा उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीचा गांभीर्याने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विचार करून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून व फोनवरून सुद्धा प्रत्यक्ष चर्चा केली आहे.
त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आ. चव्हाण यांच्या पत्राला उत्तर देत उंब्रज येथील पुलाची व्यवहारिकता तपासून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे पत्राद्वारे आश्वासन दिले आहे. यामुळे उंब्रज येथे लवकरच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून उड्डाणपुलाची पाहणी करून पुढील कारवाई होईल. आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्याबद्दल उंब्रज नागरिकांनी समाधान व्यक्त करीत त्यांचे आभार मानले आहेत.





