Nhavare News : चासकमान डाव्या कालव्यातून 600 क्युसेक विसर्ग, पण मुखईला फक्त 180 क्युसेक; उर्वरित 420 क्युसेक पाणी जाते कुठे?
Nhavare News : शिरूर आणि खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या चासकमान डाव्या कालव्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

Nhavare News : शिरूर आणि खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. धरणातून सुमारे 600 क्युसेक पाणी सोडले जात असताना मुखई परिसरात केवळ 180 क्युसेक पाणी पोहोचत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे तब्बल 420 क्युसेक पाणी नेमके कुठे जाते? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Nhavare News)
सामाजिक कार्यकर्ते सागर खंडागळे यांनी तात्यासाहेब सोनावणे, आशुतोष बेंद्रे, विशाल झेंडे आणि बाळासाहेब बेंद्रे यांच्यासह चासकमान धरणापासून सुमारे 72 किलोमीटरपर्यंत डाव्या कालव्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गळती, झिरपणे, माती-गाळ साचणे आणि देखभालीअभावी कालव्याची दुरवस्था असल्याचा दावा करण्यात आला. (Nhavare News)
टेल भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कालव्याच्या सुरुवातीच्या भागातच मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्यामुळे निमोणे, इनामगावसह शेवटच्या टोकावरील गावांपर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नाही. परिणामी प्रत्येक आवर्तनात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. (Nhavare News)
याचवेळी प्रशासनाने धरणापासून सर्वाधिक गळती असलेल्या भागाऐवजी टेल भागातून अस्तरीकरणाची कामे सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जिथे पाणीच पोहोचत नाही, तिथे आधी अस्तरीकरण करण्यामागील तांत्रिक कारण काय?” असा सवालही करण्यात आला आहे. (Nhavare News)
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे संपूर्ण कालव्याचे जललेखापरीक्षण करण्याची, प्रत्येक किलोमीटरवरील गळतीचा अहवाल सार्वजनिक करण्याची, धरणापासून मुखईपर्यंतच्या गळतीच्या भागाला प्रथम प्राधान्य देण्याची तसेच कालव्यातील गाळ, दगड आणि मलबा तातडीने काढण्याची मागणी केली आहे. (Nhavare News)
टेलच्या भागातील शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या…
1) चासकमान डाव्या कालव्याचे धरणापासून ७२ किलोमीटरपर्यंत तातडीने जललेखापरीक्षण करावे.
2) प्रत्येक किलोमीटरवरील पाण्याचा प्रवाह आणि गळती मोजून अहवाल जाहीर करावा.
3) धरणापासून मुखईपर्यंतच्या सर्वाधिक गळती असलेल्या भागाला अस्तरीकरणात प्रथम प्राधान्य द्यावे.
4) अस्तरीकरणाच्या निविदा आणि प्राधान्यक्रमामागील तांत्रिक निकष सार्वजनिक करावेत.
5) कालव्यातील दगड, माती, गाळ आणि मलबा तातडीने काढावा.
6) अनधिकृत पाणीउपसा होत असल्यास त्यावर कठोर कारवाई करावी.
7) कालव्याच्या देखभाल-दुरुस्तीतील निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित करावी.
8) धरणातुन सोडलेले आणि टेलपर्यंत पोहोचलेले पाणी याचा दैनंदिन तपशील सार्वजनिक करावा.
चासकमान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही, तर धरणात पाणी असूनही टेल भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी झगडावे लागेल. त्यामुळे आता केवळ आश्वासने नकोत, तर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब आणि प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे.
सागर खंडागळे (सामाजिक कार्यकर्ते)





