Chaskaman Dam: चासकमानचा विसर्ग कोठे मुरला? ६०० क्युसेक सोडले मात्र शेतापर्यंत पोहोचले अवघे १८० क्युसेक
Chaskaman Dam: शिरूर आणि खेड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या चासकमान डाव्या कालव्याची दुरवस्था; गाळ, दगड-मातीमुळे वहनक्षमता घटली.

Chaskaman Dam – शिरुर आणि खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या चासकमान डाव्या कालव्याची अवस्था दयनीय झाली असून, धरणातून सुमारे ६०० क्यूसेक वेगाने सोडण्यात येणाऱ्या पाण्यापैकी शिरुर तालुक्यातील मुखईपर्यंत अवघे १८० क्यूसेक पाणी पोहोचत असल्याचा गंभीर दावा कालव्याच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर करण्यात आला आहे. धरणापासून मुखईपर्यंतच्या सुमारे ६८ किलोमीटरच्या अंतरात तब्बल ४२० क्यूसेक पाणी गळती,
झिरपणे, कालव्यातील मलबा आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे नष्ट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्हावरे येथील सामाजिक कार्यकर्ते सागर खंडागळे यांनी त्यांचे सहकारी तात्यासाहेब सोनावणे, आशुतोष बेंद्रे, विशाल झेंडे आणि बाळासाहेब बेंद्रे यांच्यासह मंगळवारी चासकमान धरणापासुन ७२ किलोमीटरपर्यंत डाव्या कालव्याची कालवा मार्गाने प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान कालव्याची दुरवस्था, पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी गळती, कालव्यात साचलेला माती-दगडांचा मलबा आणि पाणीवाटपातील गंभीर विसंगती निदर्शनास आल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी कालव्यात मोठ्या प्रमाणात दगड, माती, गाळ आणि मलबा साचल्याचे निदर्शनास आले. काही भागांत कालव्याच्या भिंती आणि तळाची झीज झाल्याने पाणी मोठ्या प्रमाणात झिरपत असल्याचेही दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे.
अनेक वर्षे नियमित देखभाल, गाळ काढणे, दुरुस्ती आणि गळती रोखण्याची कामे प्रभावीपणे झाली नसल्याने कालव्याची वहनक्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे. दोन तालुक्यांची जीवनवाहिनी असलेल्या या कालव्याच्या दुरवस्थेला चासकमान प्रशासनाचा गलथान कारभार आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
४२० क्युसेकचा हिशेब कोण देणार?
चासकमान धरणातून डाव्या कालव्यात ६०० क्युसेक पाणी सोडले जात असताना ६८ किलोमीटरवरील मुखई परिसरात केवळ १८० क्युसेक पाणी पोहोचत असल्याचा दावा पाहणी पथकाने केला आहे. त्यानंतर टेलपर्यंत पोहोचेपर्यंत पाण्याची पातळी आणखी घटून १०० क्युसेकपर्यंत येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धरणातून सोडण्यात आलेले उर्वरित पाणी नेमके कुठे जाते. कालव्याच्या कोणत्या भागात किती गळती होते, किती पाणी अनधिकृतरीत्या उचलले जाते आणि किती पाणी व्यवस्थापनातील त्रुटींमुळे वाया जाते, याचा तपशीलवार आणि पारदर्शक हिशेब प्रशासनाने जनतेसमोर मांडावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
टेल भागातील शेतकऱ्यांची ओढाताणच
कालव्याच्या सुरुवातीच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यामुळे टेल भागापर्यंत अपेक्षित प्रमाणात पाणी पोहोचत नाही. परिणामी निमोणे, इनामगावसह टेल परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना प्रत्येक आवर्तनात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. चासकमान धरणात पाणी उपलब्ध असतानाही कालव्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ते पोहोचत नसेल, तर ही केवळ तांत्रिक चूक नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेची आणि नियोजनशून्य कारभाराची शोकांतिका असल्याची संतप्त प्रतिक्रिया पाहणी करणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
चासकमान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही, तर धरणात पाणी असूनही टेल भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी झगडावे लागेल. त्यामुळे आता केवळ आश्वासने नकोत, तर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब आणि प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे.
– सागर खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते.






