अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 -पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या कॅपअंतर्गतच्या पहिल्या नियमित फेरीतील प्रवेशासाठी 69 हजार 125 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावेत, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चूरस असून, आता अंतिम गुणवत्ता यादीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
अकरावी प्रवेशासाठी 317 कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, यात 1 लाख 12 हजार 30 जागा आहेत. कॅपअंतर्गत 87 हजार 156, तर कोट्याअंतर्गत 24 हजार 874 जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी 1 लाख 951 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील 84 हजार 784 विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन लॉक झाले आहेत. यातील 40 हजार 774 अर्जांची ऍटो प्रक्रियेद्वारे पडताळणी झाली आहे. मार्गदर्शन केंद्राद्वारे 43 हजार 937 अर्जांची पडताळणी झाली आहे. कोटाअंतर्गत प्रवेशासाठी 10 हजार 851 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून, त्यातील 4 हजार 358 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या नियमित फेरीसाठी अर्जाचा भाग-1 व 2 भरण्यासाठीची देण्यात आलेली मुदतवाढही संपली आहे. दि. 3 ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
नॉन क्रिमीलेअरसाठी तीन महिन्यांची मुदत
व्हिजे-एनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्यासोबत उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढही विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.




