Pune District : बारामती तालुक्यातील पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार

बारामती : राज्यात ई- व्हेईकलचे महत्त्व वाढत आहे. दिवसेंदिवस दुचाकी आणि चारचाकी ई- व्हेईकलमध्ये वाढच होणार आहे. त्यामुळे भविष्यात चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे. शहर आणि तालुक्यातील सहकारी संस्थांच्या पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी सोय होणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाच्या मेडद येथील नूतन पेट्रोलपंप इमारत व एमआयडीसी पेट्रोल पंप नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, बारामतीत चार्जिंग स्टेशन देण्याबाबत संबंधितांना विनंती केली आहे.
भविष्यातील वाढती गरज पाहता याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. खरेदी- विक्री संघाच्या मेडद येथील नूतन पेट्रोल पंप इमारतीच्या जागेत मंगल कार्यालय उभारण्याबाबत संचालक मंडळाने निर्णय घ्यावा. लवकरच परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे जाळे विकसित करण्यात येईल. त्यासाठी आराखडा तयार केला आहे.
यावेळी चेअरमन विक्रम भोसले यांनी संस्थेचा आढावा घेतला. यावेळी राजवर्धन शिंदे, सचिन सातव, संभाजी होळकर, केशवराव जगताप, पुरुषोत्तम जगताप, व्हाइस चेअरमन सोनाली जायपत्रे, संचालक दत्तात्रय आवाळे, विजय शिंदे, भारत ढवाण, लक्ष्मण जगताप, ॲड. रवींद्र माने, बाळासाहेब मोरे, बाबूजी चव्हाण, संभाजी जगताप, अशोक जगताप, लता जगताप, शिवाजी टेंगले, ज्ञानदेव नाळे, उदयसिंह धुमाळ, रमेश देवकाते, नितीन देवकाते, व्यवस्थापक नीलेश लोणकर, आदी उपस्थित होते.





