आपले सरकार सेवा केंद्राच्या अपहारप्रकरणी तिघांवर ठपका

सातारा – खटाव व खंडाळा तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र मोबदला या नावाने बनावट खाते काढून ग्रामपंचायतीच्या अग्रिम रकमेचा अपहार केल्याचा प्रथमदर्शनी ठपका तिघांवर ठेवण्यात आला आहे. केंद्राचे खटाव तालुका संगणक परिचालक व व्यवस्थापक यांनी 42 लाख 85 हजार 801 रुपये तर खंडाळा येथील संगणक परिचालकाने 2 लाख 80 हजार 637 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका तालुका व जिल्हास्तरीय समितीने ठेवला आहे. विशेष म्हणजे माण तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचे 48 हजार 624 रुपये खटावच्या बनावट खात्यात वर्ग करुन त्याचा अपहार झाला आहे. याबाबत जिल्हास्तरीय समितीच्या अहवालानुसार प्रथमदर्शनी तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विनय गौडा यांनी खटाव गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून 2016- 17 ते 2021- 22 या कालावधीत जिल्हा स्तरावरील बचत खात्यात अग्रिम रकमा जमा करण्यात आल्या आहेत. याबाबतचा ताळमेळ घालत असताना जिल्हा स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र मोबदला या प्रतापगंज पेठेतील आयडीबीआय बॅंकेतील खात्यात तफावत आढळून आली. याबाबत तालुकास्तरावर गटविकास अधिकारी व जिल्हा स्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठित करण्यात आल्या. संबंधित तालुक्यातील 20 टक्के ग्रामपंचायतींच्या जिल्हा स्तरावरील तपासणीमध्ये माण व खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या अग्रिम रकमा शासकीय खात्याव्यतिरिक्त अनाधिकृत खात्यावर वर्ग झाल्याचे दिसून आले. खटाव तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र या नावाने आयडीबीआय बॅंकेच्या वडूज शाखेत रियाज जलालुद्दिन पटेल यांची कागदपत्रे जोडून अनाधिकृत खाते उघडण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
हे खाते सप्टेंबर 2019 पासून बॅंकेने कार्यान्वित केले आहे. रियाज पटेल खटाव पंचायत समिती आपले सरकार सेवा केंद्रात तालुका संगणक परिचालक म्हणून कार्यरत होते. रियाज पटेल व विशाल उत्तम सूर्यवंशी खटाव तालुका व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना खटाव तालुक्यातील अनधिकृत खात्यावरुन विशाल सूर्यवंशी यांना रकमा वर्ग झाल्या आहेत. त्यानुसार रियाज पटेल व विशाल सुर्यवंशी यांनी संगनमताने शासकीय रकमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. खटाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींची 42 लाख 37 हजार 177 रुपये रक्कम 54 वेळा अनधिकृत खात्यावर जमा झाली आहे. खटाव तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचे 2 लाख 80 हजार 637 रुपये खंडाळा तालुक्यात वाठार बुद्रुक येथील आयडीबीआय बॅंकेच्या अनधिकृत खात्यावर वर्ग करण्यात करण्यात आले आहेत. या अनाधिकृत खात्याचे वापरकर्ता विनोद भानुदास साळुंखे (रा. खंडाळा) असून त्यांनी शासकीय रकमेचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. ही रक्कम प्रदीर्घ कालावधीनंतर संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग झाली असली तरी विनोद साळुंखे यांनी शासकीय रकमेचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
तालुकास्तरीय समिती माण यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार जिल्हास्तरीय समितीने केलेल्या तपासणीत दोन ग्रामपंचायतींचे 48 हजार 624 रुपये वडूज येथील अनाधिकृत खात्यात वर्ग झाले आहेत. या रकमेचा अपहार रियाज पटेल यांनी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. वास्तविक मुख्य लेखा व वित्त अधिकारी, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने उघडण्यात आलेल्या खात्यात पैसे वर्ग करण्याऐवजी खटाव आणि खंडाळा तालुक्यात अनधिकृत खात्यांवर पैसे वर्ग करुन 45 लाख 66 हजार 438 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका रियाज पटेल, विशाल सूर्यवंशी व विनोद साळुंखे या तिघांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणातील रियाज पटेल व विशाल सूर्यवंशी यांना घोटाळा उघडकीस आल्यानंतर सेवेतून कमी करण्यात आले आहे. या तिघांवर 24 तासांच्या आत गुन्हा दाखल करा, असे आदेश विनय गौडा यांनी खटावच्या गटविकास अधिकाऱ्यांना दि. 19 रोजी दिले आहेत. दरम्यान, प्रथमदर्शनी या प्रकरणात तिघांचा सहभाग असला तरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यात अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने अनेकांनी धडकी घेतली आहे.
बोगस खात्यातून अनेकांच्या खात्यावर मोठ्या रक्कमा
खटाव तालुक्यात बॅंकेत काढण्यात आलेल्या बोगस खात्यातून ऍव्हेन्यू सुपर मार्टस 5 हजार 249 रुपये, बॅंक चार्जेस 10 हजार 878 रुपये, कॅश विड्रॉल 28 लाख 78 हजार, डी मार्ट सातारा 8 हजार 291, गणेश शिवाजी जाधव 98 हजार रुपये, हॉटेल खर्च 2 हजार 732 रुपये, विमा 11 हजार, माळवे फर्टियायझर्स एक हजार 25 रुपये, नंदकुमार ऍन्ड एक हजार 700 रुपये, प्रतीक्षा सिद 95 हजार, रोहित सुधाकर सुर्यवंशी 49 हजार रुपये, रुपे डेबिट कार्ड 9 हजार 8 रुपये, सचिन पांडुरंग शिंदे 1 लाख 70 हजार रुपये, स्वत: धनादेशाने 3 लाख 50 हजार, तनुजा इंटरप्रायजेस 13 हजार 750, टेक प्रोसेस पेमेंट 15 हजार 575, विशाल उत्तम सूर्यवंशी 7 लाख 94 हजार असे 45 लाख 13 हजार 888 रुपये वर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून उघडकीस आलेला घोटाळा गंभीर असून यातील कोणाचीही गय केली जाणार नाही. प्रथमदर्शनी तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग असला तरी पोलिस तपासात आणखी नावे उघड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अपहाराची रक्कम भरली म्हणून यातून कोणी वाचणार नसून अपहार करणाऱ्यांना कडक शासन होण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे काम राहणार आहे.
विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी





