Char Dham Yatra 2023 : दरडी कोसळल्यामुळे बद्रीनाथ मार्ग ठप्प; यात्रेकरूंची झाली कुचंबणा

चमोली (उत्तराखंड) – चमोलीच्या बाजपूर भागातील टेकडीवरून दरडींचा ढिगारा कोसळल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे चार धाम यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंची मोठीच कुचंबणा झाली आहे. तत्पूर्वी, शनिवारी रात्री उशिरा चार धाम यात्रेकरूंना केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी आणि सखल भागात पडणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे श्रीनगरमध्येच थांबवण्यात आले होते.
यासोबतच प्रवाशांना जवळच्या शहरांमध्ये थांबण्याचे आवाहन केले जात होते. श्रीनगर गढवालमध्ये पोलिसांनी एनआयटी उत्तराखंड आणि बद्रीनाथ बसस्थानकाजवळ चेकिंग पॉइंट बनवले आहेत जिथे चार धाम यात्रेकरूंना थांबवले जात आहे आणि ज्यांच्याकडे रात्रीच्या मुक्कामासाठी ऑनलाइन बुकिंग आहे त्यांना रुद्रप्रयागच्या दिशेने जाण्याची परवानगी दिली जात आहे.
परंतु ज्या प्रवाशांनी बुकिंग केलेले नाही त्यांना श्रीनगरमध्येच राहण्याचे आवाहन केले जात आहे. श्रीनगरमध्ये राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था आहे आणि प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.





