चन्नी म्हणतात, मोदींच्या कार्यक्रमात ७० हजार खुर्च्या अन् ७०० लोकही नव्हते; सुरक्षेत त्रुटी नव्हत्याच

नवी दिल्ली – सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील नियोजित कार्यक्रम सोडून नवी दिल्लीला परतले. त्यानंतर या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणावर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागावले आहे. पंतप्रधानांच्या नियोजित मार्गावर निदर्शने सुरू झाल्याने उड्डाण पुलावर मोदी यांना सुमारे 15 मिनिट अडकून पडावे लागले.
गृहमंत्रालयाचा दावा
पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे शेड्यूल आणि प्रवासाचा कार्यक्रम पंजाब सरकारला खूप आधी कळवण्यात आला होता. त्यामुळे पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा आणि सामरिक तयारी करून ठेवणे अपेक्षित होते. तसेच या मार्गावर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था नेमणे आवश्यक होते. मात्र तसा बंदोबस्त तैनात करण्यात आला नव्हता, असे गृहमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींचे प्रकरण गृहमंत्रालयाने गांभीर्याने घेतले आहे. राज्य सरकारला या त्रुटीची जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून इन्कार
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचे नाकारले आहे. रस्त्याने प्रवास करण्याची पंतप्रधानांची योजना अखेरच्या मिनिटाला आखण्यात आली. सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी नव्हती. त्यांच्या मेळाव्याच्या तयारीचा मी काल रात्री मी व्यक्तीश: आढावा घेतला होता. पंतप्रधानांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला. त्याआधी ते हेलीकॉप्टरने जाणार होते, असे चन्नी म्हणाले.
70 हजार खुर्च्या अन्…
पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी 70 हजार खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या आणि तेथे 700 लोकही उपस्थित नव्हते, असा दावा चन्नी यांनी केला.
गृहमंत्रालयाच्या दाव्यानुसार
पंतप्रधान नरेंद्र मोदी बठींडा येथे बुधवारी विमानाने उतरले. तेथून हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकात हेलीकॉप्टरने जाणार होते. मात्र, पाऊस आणि दृष्यमानता कमी असल्यामुळे पंतप्रधान 20 मिनिटे हवामान स्वच्छ होण्याची वाट पहात थांबले, असे गृहमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
वातावरण लवकर स्वच्छ होण्याचे लक्षण दिसत नसल्याने त्यांनी राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाला भेट देण्यासाठी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दोन तासांपेक्षा अधिक काळ लागणार होता. पंजाबच्या पोलीस महासंचालकांकडून सुरक्षा व्यवस्थेची हमी मिळाल्यानंतर ते पुढे निघाले.
राष्ट्रीय शहीद स्मारक 30 किमीवर असताना पंतप्रधान ज्यावेळी उड्डाण पुलावर पोहोचले. त्यावेळी निदर्शकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उड्डाण पुलावर 15 ते 20 मिनिटे अडकून पडले. ही सुरक्षा व्यवस्थेतील सर्वात गंभीर त्रुटी होती, असे गृहमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. या सुरक्षेच्या त्रुटीनंतर पंतप्रधानांनी बठिंडा विमानतळावर परत जाण्याचा निर्णय घेतला, अशी पुस्तीही त्यात जोडण्यात आली आहे.
भाजपकडून टीकेची झोड
पंतप्रधानांची भेट ही हजारो कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी होती. मात्र आम्ही पंजाबच्या विकासाच्या आड येण्याचे राजकारण करणाऱ्या कोत्या मनोवृत्तीचे नाही आहोत. पंजाब पोलिसांनी कार्यक्रमाला जाण्यापासून रोखले. पोलिसांच्या अडेलतट्टूपणामुळे मोठ्या संख्येने बस अडवून ठेवण्यात आल्या. निदर्शकांच्या सोयीच्या भूमिका घेण्यात आल्या. हे प्रकरण सोडवण्यासाठी फोन स्वीकारण्यासही मुख्यमंत्री चन्नी यांनी नकार दिला. लोकशाही मूल्यांवर श्रध्दा असणाऱ्या कोणासही पंजाब सरकारचे वर्तन त्रास देणारे असेल, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले.





