Chandrkant Patil on Ulhasnagar Firing – एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. याहूनही धक्कादायक म्हणजे हा गोळीबार थेट पोलीस स्टेशनमध्ये तेही वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयात घडला होता.
या घटनेचे सिसिटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून आमदार गायकवाड आपल्याच सहकारी पक्षाच्या नेत्यावर बेछूट गोळीबार करताना दिसत आहेत.
कल्याणची घटना राज्यामध्ये एकत्र सत्तेत असलेल्या भाजप व शिवसेना (शिंदे) यांच्यामध्ये विवादाचे कारण ठरणार काय अशी चर्चा सुरु होती. मात्र दोन्ही बाजूकडील नेत्यांनी याबाबत संयमी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत होते.
अशातच आज भाजपचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत मांडलेली भूमिका शिंदेंच्या शिवसेनेच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील? | Chandrkant Patil on Ulhasnagar Firing
टाळी एका हाताने वाजत नाही. घटनेची पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत घाईघाईने प्रतिक्रिया देणे हे एखाद्यावर अन्याय केल्यासारखे होईल. यासंदर्भात एस आय टी नेमलेली आहे त्यातून काय ते पुढे येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं आहे.
जुना वाद
आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. हा वाद एका जमीन प्रकरणावरून उफाळून आल्याची माहिती आहे. दोघांमध्ये जुने वाद असल्याचे देखील समजते.
गणपत गायकवाड यांचा तो आरोप अन् चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया | Chandrkant Patil on Ulhasnagar Firing
गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदेंच्या शिवसेनेकडून गळचेपी होत असल्याचा आरोप केला होता. येथील खासदार श्रीकांत शिंदे परस्पर विकासकामांचे लोकार्पण करतात.
आपण केलेल्या कामांवर स्वतःचे नाव लावतात असे गंभीर आरोप देखील गायकवाड यांनी केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी आरोप केले होते.
अशातच आज चंद्रकांत पाटील यांनी याबाबत बोलताना, ‘टाळी एका हाताने वाजत नाही’ असं वक्तव्य केल्याने गणपत गायकवाड यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
‘मराठ्यांच्या हजामती करू नका…’ भुजबळांचे ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण