नागपूर – “चांद्रयान-3′ मिशनची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी सर्व आवश्यक चाचण्यांसह सर्व तयारीही अंतिम टप्प्यात असून प्रेक्षणपासाठी अनुकूल वातावरणाची प्रतिक्षा आहे. येत्या जून ते जुलै दरम्यान चांद्रयान- 3 अंतराळात सोडण्यात येणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली. नागपूरमध्ये येथे 108व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या दुसऱ्या दिवशी आयोजित सत्रानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गृह मंत्रालयाच्या अहवालाला खोटेपणाचा दर्प – मेहबुबा मुफ्ती
सोमनाथ म्हणाले, “चांद्रयान-2′ प्रमाणे आमचे संशोधनाचे उद्देश सारखेच आहेत. गेल्यावेळी ज्या चुका झाल्या त्या टाळून यानाचे सुरक्षित लॅन्डिंग आणि लॅन्डिंगनंतर रोटर सुरक्षितरित्या बाहेर निघावे याकडे विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे जून-जुलैमध्ये ते सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच चांद्रयान-3 चाही उद्देश सारखाच असून चांद्रयान-3 मध्ये वापरण्यात आलेले सॉफ्टवेअर, सेन्सर, तंत्रज्ञान आदी अपग्रेड करण्यात आले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही चांद्रयान-3 काम करु शकेल असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, मंगळयानाची घोषणा एका महिन्यात होणार आहे. मात्र, शुक्रयान-1 मिशन हा विषय सध्या संकल्पेपुरता असून त्याबाबत दोन समिती तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या सरकारसमोर आपले तथ्थ मांडणार असल्याची त्यांनी सांगितले.
स्पेस डेव्हलपमेंटमध्ये खासगी भागीदारी
इस्रोने 60 वर्षांमध्ये अंतराळात मोठी प्रगती केली आहे. आता त्यात खासगी संस्थांची भागीदारी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, हे करत असताना काही कायदे, काही जबाबदाऱ्या आणि निश्चित धोरण ठरवावे लागणार आहे. त्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. तो मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत त्याला मान्यता मिळण्याची शक्यताही एस. सोमनाथ यांनी व्यक्त केली.