चांद्रयान-3 उतरलेल्या चंद्रावरील जागेविषयी आश्चर्यकारक माहिती आली समोर, पृष्ठभागाचे वय आहे तब्बल…

Chandrayaan-3 | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) चांद्रयान-3 ला दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँड करत इतिहास रचला होता. चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्रावर ज्याठिकाणी उतरले त्या बिंदूला ‘शिव शक्ती’ असे नाव देण्यात आले होते. आता या शिव शक्ती पॉइंटविषयी आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्रावर ज्याठिकाणी लँड झाले ती जागा तब्बल 3.7 अब्ज वर्षांपेक्षा जुनी आहे. एका अभ्यासात याबाबतची माहिती समोर आली आहे. उच्च-रिझोल्यूशन असलेल्या रिमोट सेन्सिंग डेटासेट्सचा वापर करून या पृष्ठभागाचे अंदाजित वय काढण्यात आले आहे.
बंगळुरूतील इस्रोच्या इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम सेंटरचे, अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे आणि चंदीगडच्या पंजाब युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिकांचा या संशोधनात समावेश आहे. या तज्ज्ञांनी चांद्रयान-3 च्या लँडिंग साइट, म्हणजेच शिवशक्ती पॉइंटचा सविस्तर नकाशा तयार केला आहे.
अभ्यासानुसार, चांद्रयान-3 च्या लँडिंग साइटला तीन भागांमध्ये विभागले जाऊ शकते. भौगोलिक नकाशानुसार, यामध्ये हाय-रिलीफ रग्ड एरिया, स्मूथ प्लेन्सआणि लो-रिलीफ स्मूथ प्लेन्सचा समावेश आहे. वैज्ञानिकांचा हा अभ्यास सायन्स डायरेक्ट जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यामध्ये ही लँडिंग साइट जवळपास 3.7 अब्ज वर्षे जुनी असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे हाच तो कालखंड आहेजेव्हा पृथ्वीवर सर्वात प्राचीन सूक्ष्मजीव जीवन विकसित होऊ लागले होते.
इस्रोच्या वैज्ञानिकानुसार चंद्राच्या पृष्ठभागावर होणाऱ्या हालचाली व तापमानातील बदल यामुळे सतत बदल होत राहतात. लाखो वर्षांनंतर, हे खडक तुटून रेगोलिथमध्ये बदलले आहेत. दरम्यान, भारताने पुढील चंद्रयान मिशन चांद्रयान-4 ची योजनाही तयार केली आहे. ही मोहीम वर्ष 2027 मध्ये प्रक्षेपित होईल.





