चांद्रयान-3 प्रक्षेपणासाठी सज्ज.! ‘इस्रो’च्या नव्या मोहिमेचे पुढील आठवड्यात होणार प्रक्षेपण

श्रीहरीकोटा – भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच “इस्रो’च्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. चांद्रयान-3 लॉंच व्हेइकल म्हणजेच रॉकेटसोबत जोडले गेले आहे. चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, “चांद्रयान-3 ची एन्कॅप्स्युलेटेड असेंबली बुधवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये लॉंच व्हेईकलशी (एलव्हीएम-3) जोडण्यात आले आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
चांद्रयान-3 चे प्रक्षेपण जुलै महिन्याच्या मध्यात होईल,’ असे इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले आहे. “लॉन्च व्हेईकल मार्क-3′ हे रॉकेट भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने विकसित केले आहे.
“चांद्रयान-3′ ही भारताची महत्वाची चंद्र मोहिम आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान-3 इस्रोच्या चंद्र मोहिमेतील तिसरे चांद्रयान आहे. याआधीच्या चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2 प्रक्षेपित करण्यात आले होते. त्याद्वारे, चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात आला. पण आता चांद्रयान-3 चंद्रावरून उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करणार आहे.
फक्त लॅंडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल
भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेचा महत्त्वाचा भाग चांद्रयान-3 हा चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2 चा पुढील टप्पा आहे. चांद्रयान-3 अगदी चांद्रयान-2 सारखंच असणार आहे. परंतु, यावेळी फक्त लॅंडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून चांद्रयान-3 साठी मदत घेण्यात येणार आहे.
चांद्रयान-3 यूएन राव उपग्रह केंद्रातून प्रक्षेपित केले जाणार आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याची योजना आहे. चांद्रयान-3 च्या साहाय्याने चंद्रावर वैज्ञानिक उपकरणे पाठवून त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. भविष्यातील मानवी चंद्र मोहिमेच्या दृष्टीने ही मोहिम फार महत्त्वाची आहे.





