मुंबई : राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांसह प्रशासन कामाला लागले आहे. या निवडणूका स्थानिक स्तरावर होत असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. या निवडणूका भाजप महायुती म्हणून एकत्र लढणार कि स्वतंत्र लढणार ? याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? ‘राज्यातील सर्व निवडणुका आम्ही एकत्र महायुती म्हणून लढणार आहोत. याबाबतचे आदेश आम्ही पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. आमचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते एकमेकांची याबाबत चर्चा करत आहेत. मात्र जर एखाद्या ठिकाणी एखाद्या जागेवरून वाद निर्माण झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र इतर ठिकाणी युतीत निवडणुका लढल्या जातील, त्यामुळे संभ्रम बाळगण्याची गरज नाही’ असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. कधीपर्यंत जाहीर होणार निवडणूका? राज्य सरकारने महापालिकांना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाकडूनही या निवडणुकांची तयारी केली जात आहे. ही प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयुक्तांकडून निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. प्रभाग रचनेच्या कामाला साधारण अडीच महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे.