महाराष्ट्रात मोठं हत्याकांड..! पोलीस मुलीने वडिलांना संपवलं; ३ वर्षांनी प्रियकराने उलघडला धक्कादायक कट
Chandrapur Crime News : चंद्रपूरमधील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलगी आर्या बाल्लावार हिने प्रियकरासह मिळून वडिलांना विष देऊन मारले.

Chandrapur Crime News : चंद्रपूर जिल्ह्यातील रामनगर परिसरात एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. प्रेमसंबंधांना विरोध करणाऱ्या पोलीस वडिलांची स्वतःच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने विष देऊन हत्या केल्याची घटना तब्बल तीन वर्षांनी समोर आली आहे.
या प्रकरणात मृत पोलीस कर्मचारी जयंत बाल्लावार (४५) यांची मुलगी आणि पोलीस कर्मचारी आर्या बाल्लावार (२२), तिचा प्रियकर आशिष शेडमाके (३०) आणि इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्या आणि आशिष यांच्यात दीर्घकाळ प्रेमसंबंध होते. मात्र या नात्याला जयंत बाल्लावार यांचा तीव्र विरोध होता. याच कारणातून दोघांनी मिळून त्यांना विष देऊन ठार मारण्याचा कट रचला.
२५ एप्रिल २०२३ रोजी जयंत बाल्लावार यांचा ड्युटीदरम्यान अचानक मृत्यू झाला होता. त्यावेळी मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र, अलीकडेच आरोपी आशिष शेडमाके याने या प्रकरणाची कबुली दिल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले.
पोलिसांच्या तपासात उघड झाले की, आर्याने वडिलांना दिलेल्या मिल्कशेकमध्ये विष मिसळले होते. ते पिल्यानंतर ते कार्यालयात गेले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. या कटासाठी विषही अन्य आरोपीकडून खरेदी करण्यात आले होते.
वडिलांच्या मृत्यूनंतर आर्या आणि आशिष यांनी लग्न केले. मात्र नंतर त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या आशिषनेच संपूर्ण प्रकरण पोलिसांसमोर उघड केले.
या प्रकरणात रामनगर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.





