Son Killed Mother : क्षुल्लक कारणावरून संतापाच्या भरात मुलाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ही मन हेलावून टाकणारी घटना मूल तालुका येथील डोंगरगाव येथे घडली. सुमित्रा पेटकुले (वय ६५) असे मृत महिलेचे नाव असून आरोपी मुलगा जगदीश दशरथ पेटकुले (वय ३५) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१९ फेब्रुवारी) रात्री सुमित्रा यांनी घरी कारल्याची भाजी बनवली होती. घरी आल्यानंतर जगदीशने कारले का बनवले, यावरून आईशी वाद घातला. रागाच्या भरात त्याने आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सुमित्रा यांचा जागीच मृत्यू झाला. माहितीनुसार, आरोपीला दारूचे व्यसन होते. घरगुती कलह आणि मारहाणीमुळे त्याची पत्नी दोन महिन्यांपूर्वीच मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. त्यानंतर तो आईसोबत राहत होता. घटनेच्या रात्री तो दारूच्या नशेत असल्याचेही समोर आले आहे. घटनेची माहिती गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच मूल पोलीस ठाणे येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.