Chandrakant Patil: कौशल्य शिक्षणानेच समृद्ध भारताचे स्वप्न साकार; मंत्री चंद्रकांत पाटील याचे प्रतिपादन
Chandrakant Patil:

Chandrakant Patil – बदलत्या काळात कौशल्य विकासाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोहोचवण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशा संस्थांना शासन सर्व आवश्यक पायाभूत सुविधा पुरवेल, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या कुलपतीपदी डॉ. स्वाती मुजुमदार यांची नियुक्ती झाल्याबद्दल आयोजित विशेष गौरव सोहळ्यात ते बोलत होते.
या प्रसंगी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सिंबायोसिसचे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार आणि संजिवनी मुजुमदार उपस्थित होते. डॉ. स्वाती मुजुमदार यांनी कौशल्य विकासासाठी आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी जागतिक पातळीवर मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सिंबायोसिस कौशल्य विकास आणि व्यवसाय प्रशिक्षण विद्यापीठ मोठी झेप घेईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
भविष्यात सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक शिक्षण विद्यापीठ जगातील कौशल्य विकासाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की, विद्यापीठाने २०० पेक्षा अधिक उद्योगांशी करार केले असून, उद्योग जगताच्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार केले जातात.
तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पदविका अभ्यासक्रमांत ९० टक्के महिलांचा सहभाग असून, २४ टक्के विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योग सुरू केले आहेत. परीक्षा नियंत्रक डॉ. सुनीता निकम यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. नरेंद्र सोनी यांनी आभार मानले.





