Chandrakant Patil : “माझ्या विधानाचा विपर्यास केला!” पुणे विद्यापीठ वादावर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण
Chandrakant Patil : गेल्या चार वर्षांत पदभरती आणि निधीसाठी स्वतः पुढाकार घेतला; विद्यापीठाच्या योगदानाला कमी लेखण्याचा हेतू नसल्याचा पुनरुच्चार.

Chandrakant Patil – डीईएस पुणे विद्यापीठात तीन दिवसांपूर्वी केलेल्या एका विधानाचा काही लोकांकडून विपर्यास केला जात असल्याचा आरोप राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे समाजासाठी योगदान काय, या आपल्या प्रश्नामागे पाल्याच्या प्रगतीची चिंता करणाऱ्या पालकासारखीच एक सकारात्मक आणि प्रोत्साहन देणारी भावना होती, असे सांगत पाटील यांनी या वादावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
काही घटकांकडून जाणीवपूर्वक चुकीचा संदेश पसरवण्याचा प्रयत्न केला जात असून, विद्यापीठाच्या योगदानाला कमी लेखण्याचा आपला अजिबात हेतू नव्हता, असेही त्यांनी सांगितले. याबाबतचे सविस्तर निवेदन चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध केले आहे. पुणे विद्यापीठ हे देशाचे एक महत्त्वाचे ज्ञानकेंद्र असून, अनेक संस्था या विद्यापीठाकडे एक आदर्श म्हणून बघतात; परंतु भारताला जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता बनवायचे,
असेल तर विद्यापीठांमधील संशोधन केवळ शोधनिबंध प्रकाशित करण्यापुरते मर्यादित न राहता, त्यातून समाजापुढील प्रत्यक्ष आव्हाने सुटली पाहिजेत. नीती आयोगाच्या अहवालाचा हवाला देत त्यांनी स्पष्ट केले, की आयआयटीसारख्या संस्थांइतके उल्लेखनीय संशोधन पारंपरिक विद्यापीठांमध्ये होण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे.
राज्यामध्ये याच संशोधनाला दर्जेदार स्वरूप देण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका स्वतंत्र तज्ज्ञ गटाची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. गेल्या चार वर्षांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून विद्यापीठातील पदभरती आणि विविध प्रकल्पांद्वारे संशोधनासाठी निधी मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यानिमित्ताने विद्यापीठाचे गुणगान
यापूर्वी जे लोक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते, तेच लोक आज माझ्या विधानाचा विपर्यास करण्याच्या नादात का होईना, विद्यापीठाचे गुणगान गाताना दिसत आहेत. याचे समाधान वाटते, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.





