“चंद्रहार पाटील कुटील माणसांपासून स्वच्छ मनाच्या माणसांकडे आलेत” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे – डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते पैलवान चंद्रहार पाटील यांनी काल रात्री ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह हा निर्णय घेतला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र काँग्रेसच्या विरोधामुळे त्यांचा पराभव झाला.
पक्षप्रवेशानंतर पाटील म्हणाले, “माझे राजकीय गुरू अनिल बाबर यांनी मला 2006च्या जिल्हा परिषद निवडणुकीत उभे केले. महाविकास आघाडीवर माझा आक्षेप आहे, नेत्यांवर नाही. सांगलीत घराणेशाहीची किड लागली आहे. मी क्रीडा क्षेत्रासाठी आणि मातीच्या खेळाला प्राधान्य देण्यासाठी शिंदे गटात आलो आहे.” त्यांनी कोणतेही पद न मागता सांगलीत पक्षाला बळकट करण्याचे आश्वासन दिले.
एकनाथ शिंदे म्हणाले, “चंद्रहार पाटील कुटील माणसांपासून स्वच्छ मनाच्या माणसांकडे आले आहेत. त्यांनी कुस्तीला लौकिक मिळवला. 2022 मध्ये मी समोरच्या लोकांना चारीमुंड्या चीत केले. पैलवानांना डावपेच माहित असतात.” त्यांनी पाटील यांच्या रक्तदान शिबिराच्या संकल्पाचे स्वागत करत दिल्ली किंवा काश्मीरमध्येही शिबिर घेण्याची घोषणा केली.
चंद्रहार पाटील यांचा प्रवास:
-डबल महाराष्ट्र केसरी विजेते
-2008 मध्ये सांगली जिल्हा परिषदेत विजयी
-2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव
-ठाकरे गटाचे राज्य संघटक म्हणून जबाबदारी





