पिंपरखेड बिबट्या हल्ला प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दिलासा

पिंपरखेड (ता. शिरूर) : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे, शिवन्या शैलेश बोंबे व जांबुत येथील भागुबाई जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची तातडीने दखल घेत घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेतर्फे आर्थिक मदत जाहीर केली होती.
त्यानुसार या तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदत किल्ले शिवनेरी, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे व युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते पीडित कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मृतांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत ही घटना अत्यंत दुःखद व दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली. शासन व शिवसेना पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभी असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाला ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य व पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील, निरगुडसर गावचे सरपंच रविंद्र वळसे पाटील, युवासेना शिरूर लोकसभा अध्यक्ष वैभव पोखरकर, युवासेना तालुकाप्रमुख विकास राऊत, श्रीकांत लोखंडे, किरण ढोबळे, माजी सरपंच नरेश ढोमे, उपसरपंच विकास वरे, कैलास बोंबे, कमलेश ढोमे, सोपान गावशेते, लक्ष्मण गायकवाड, माऊली ढोमे यांच्यासह शिरूर व आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, युवासैनिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





