Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडूंची ‘NDA’च्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

Chandrababu Naidu । NDA Government – आंध्र प्रदेशात सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू झाली असून मंगळवारी तेलुगु देशम पक्ष आणि एनडीएने चंद्राबाबू नायडू यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली.
विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर, टीडीपी, भाजप आणि जनसेना युतीचे नेते राज्यपाल एस अब्दुल नजीर यांची भेट घेतील आणि सरकार स्थापनेचा दावा केला. चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत आणखी अनेक नेते बुधवारी शपथ घेऊ शकतात.
बुधवार, दि. १२ जून रोजी आंध्र प्रदेशात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. दरम्यान, जनसेना पक्षाने पक्षप्रमुख पवन कल्याण यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे.
पवन कल्याण मंगळवारी सकाळी मंगळागिरी येथील पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले, तेथे जनसेना पक्षाच्या आमदारांनी त्यांची नेता म्हणून निवड केली. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पक्ष आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील १७५ पैकी १३५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने २१ जागा जिंकल्या असून भाजपनेही आठ जागा जिंकल्या आहेत. जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष वायएसआरसीपी फक्त ११ जागांवर घसरला आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत टीडीपी, जनसेना आणि भाजपने युती करून निवडणूक लढवली होती.
विजयवाडा येथे एनडीए आघाडीच्या आमदारांची बैठक झाली. टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नाडू, जनसेना प्रमुख पवन कल्याण आणि आंध्र प्रदेश भाजप अध्यक्ष दग्गुबती पुरुंडेश्वरी यांच्यासह सर्व एनडीए आमदार या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनी एनडीएच्या वतीने चंद्राबाबू नायडू यांच्या नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव ठेवला, त्याला सर्व आमदारांनी पाठिंबा दिला.





