Chandra Arya : पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाचे ‘चंद्रा आर्य’ उत्सुक

ओटावा, (कॅनडा) – कॅनडाच्या पंतप्रधानपदासाठी लिबरल पार्टीच्या नेतेपदाची निवडणूक लढवण्यास आपण उत्सुक असल्याचे भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी म्हटले आहे. देशाला सार्वभौम, प्रजासत्ताक बनवणे, निवृत्तीचे वय वाढवणे, नागरिकत्वाच्या आधारे कर रचना लागू करणे आणि पॅलेस्टिनला स्वतंत्र देशाचा दर्जा मान्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. आर्य हे हिंदू कॅनडीयनांच्या हितासाठी आग्रही आहेत. या मुद्यावरून लिबरल पक्षाच्याच सहकाऱ्यांशी त्यांचे नेहमी खटके उडत असतात.
ओटावाचे उपनगर असलेल्या नेपियनमधून २०१५ मध्ये सर्वात पहिल्यांदा खासदार म्हणून निवजून आलेल्या चंद्रा यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला आहे. सोशल मीडियावरच्या आपल्या १४ पानी निवेदनामध्ये त्यांनी आपले घोषणापत्र जाहीर केले आहे. आपल्या मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या मर्यादित असेल.
मात्र हे मंत्रिमंडळ देशाची फेरउभारणी करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित, समृद्ध करण्यासाठी निश्चितच परिणामकारक असेल. आपण आतापर्यंत नेहमीच कॅनडासाठी सर्वोत्तम असलेल्या गोष्टींसाठी कष्ट केले आहेत. आपल्या मुलांसाठी आणि नातवंडांसाठी आपल्याला काही धाडसी निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे.
कॅनडातील अनेक नागरिक विशेषतः तरुण पिढी, महागाईला तोंड देत आहेत आणि कामगार मध्यमवर्ग संघर्ष करत आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी करणारे निर्णय घेतले जाणे कॅनडासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणाले.





