पुणे – पूर्व मध्य व लगतच्या अग्नेय भागावर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्व मध्य अरबी समुद्रावर स्थिर आहे, तर एक कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरावर तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार, तर काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. राज्यात गेल्या ४८ तासांत पावसाचा जोर वाढला असून, शुक्रवारी (दि. २४) कोकण-गोव्यातील बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार तर मध्यम सरी पडल्या. घाटमाथ्यावर जोरदार सरींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. पिकांचेही नुकासान झाल्याच्या घटना समोर आल्या. दि. २५ ऑक्टोबर रोजी कोकणाती बहुतांश, मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच, तर मराठवाडा आणि विदर्भातील काही पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामध्ये पुढील २४ तासांत ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मेघगर्जना, ३० ते ४० ताशी वेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा जिल्हा व घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर याठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक जिल्हा व घाट विभाग, अहिल्यानगर आणि पुणे जिल्हा व घाट विभागातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० वेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, गडचिरोली, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याने या सर्व जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.